सीमा सुरक्षा दलाचे १० जवान अचानक बेपत्ता
बीएसएफच्या ८३ व्या बटालियनचे १० जवान अचानक बेपत्ता झाले आहेत.
मुघलसराय : बीएसएफच्या ८३ व्या बटालियनचे १० जवान अचानक बेपत्ता झाले आहेत. पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादहून जम्मूकडे जात होते. हे जवान एका खास रेल्वेने जात होते. मात्र, हे सर्व जवान बेपत्ता असल्याचे वृत्त हाती आलेय. याप्रकरणी मुघलसराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून या जवानांचा शोध घेण्यात येत आहे.
पश्चिम बंगालहून लष्करासाठीच्या विशेष रेल्वेने जम्मू कश्मीरमधील सांबा जिल्ह्यासाठी हे जवान रवाना झाले होते. सीमा सुरक्षा दलाचे १० जवान अचानक बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या जवानांचे अपहरण झाले की ते पळून गेले याबाबत अद्याप काहीच समजलेले नाही.
हे सर्व जवान बीएसएफच्या ८३ व्या बटालियनमध्ये तैनात होते. रेल्वेतून जम्मू-काश्मीरकडे जात असता वर्धमान आणि धनबाद रेल्वे स्टेशनादरम्यान ते बेपत्ता झाले. उत्तर प्रदेशातील मुघलसराय रेल्वे स्थानकात गाडी पोहोचल्यावर हा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी मुघलसरायच्या जीआरपी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यात आली आहे.
बीएसएफचे सुखबीर सिंह यांनीही जवान बेपत्ता झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलाय. हे जवान पश्चिम बंगालच्या मुर्शीदाबादवरून ८३ व्या बीएन बटालियनच्या बीएसएफ जवानांना घेऊन आर्मीच्या रेल्वेने जम्मूकडे निघाले होते. या दरम्यान ही रेल्वे वर्धमान आणि धनबाद स्टेशन दरम्यान थांबली होती. तिथूनच ते गायब झाले असावेत, असं सुखबीर सिंह यांनी म्हटलेय.
वर्धमान रेल्वेस्थानकातून प्रदीप नावाचा जवान बेपत्ता झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर शिव सिंह, कैलाश कुमार, दीपक कुमार, दीपक सिंह, अमित कुमार, चवन सिंह, अश्वनी कुमार, रोहित वर्मा, गोविंद कुमार हे धनबादमधून बेपत्ता झाले असून या जवानांचा जीआरपी पोलिसांनी शोध सुरु केला आहे.