Lentil Import : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) यांनी खलिस्तानी नेता आणि मोस्ट वॉन्टेड हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारताचीही (India) भूमिका असू शकते,  असे भरसंसदेत म्हटल्याने खळबळ उडाली आहे. हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असू शकतो असे जस्टिन ट्रूडो यांनी म्हटलं होतं. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध चांगलेच ताणले गेले आहेत. ट्रूडो यांनी केलेल्या आरोपांना भारताने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. कॅनडाच्या नागरिकांना व्हिसा देणे तात्पुरते स्थगित करण्याच्या निर्णय भारतानं घेतला आहे. मात्र आता याचा फटका देशातील नागरिकांनाही बसण्याचीही शक्यता आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या आरोपानंतर भारत आणि कॅनडामधील तणाव वाढला आहे. मात्र त्याचा परिणाम आता सर्वसामान्यांवरही होण्याची शक्यता आहे. दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला तर त्याचा परिणाम मसूराच्या डाळीवरही (lentils) होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे भारत दरवर्षी कॅनडाकडून मोठ्या प्रमाणात मसूर खरेदी करतो. मात्र, भारताकडे इतरही पर्याय आहेत.


माध्यमांच्या वृत्तानुसार, भारत दरवर्षी कॅनडाकडून सुमारे 4-5 लाख टन मसूर खरेदी करतो. मात्र कॅनडासोबतच्या संबंधांमुळे मसूर आयात करण्यात काही अडचण आल्यास भारत ऑस्ट्रेलियाकडूनही त्याची खरेदी शकतो. सध्या चणा डाळीनंतर मसूर ही दुसरी स्वस्त डाळ आहे. मात्र या पुरवठा साखळीमध्ये अडचण निर्माण झाल्यास मसूरच्या किमतीतही वाढ होण्याची शक्यता आहे.


भारताने यावर्षी आतापर्यंत 11 लाख टन मसूर आयात केल्याची माहिती समोर आली आहे. तूर डाळीला पर्याय म्हणून मसूरच्या डाळीचा वापर वाढला आहे. तूर महागल्याने लोकांनी मसूरचा वापर जास्त सुरु केला आहे. 2022-23 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियातून 3.5 लाख टन मसूर आयात केला होता. तर कॅनडाकडून 4.85 लाख टन मसूर आयात केला होता. 2023-24 आर्थिक वर्षात आतापर्यंत ऑस्ट्रेलियातून 2.67 लाख टन आणि कॅनडातून 1.90 लाख टन मसूरची आवक झाली आहे.


किमती वाढण्याची शक्यता


दरम्यान, 2023 मध्ये कॅनडातील मसूराचे उत्पादन 15.4 लाख टनांपर्यंत कमी झालं आहे. मागील वर्षी हे उत्पादन 23 लाख टन होते.  गेल्या महिन्यातच मसूरच्या किमतीत सुमारे 100 डॉलरची वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र आता दोन्ही देशांमधील संबंध ताणल्याने या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.


दरम्यान, दोन्ही देशांमध्ये काही व्यापारी करार होणार होते, तेही तूर्तास स्थगित करण्यात आले आहेत. 2023 मध्ये कॅनडा आणि भारत यांच्यातील व्यापार 8 अब्ज डॉलर्स म्हणजेच 67 हजार कोटी रुपयांचा होता. भारत आणि कॅनडा यांच्यातील तणाव दीर्घकाळ सुरू राहिल्यास त्याचा सर्वात मोठा परिणाम मसूर आणि म्युरिएट ऑफ पोटॅश खताच्या पुरवठा आणि किमतीवर होण्याची शक्यता आहे.