श्रीनगर: काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर स्फोटकांनी भरलेली गाडी आदळून भीषण स्फोट घडवून आणला. यामध्ये सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला. भारतीय सैन्यावर गेल्या २० वर्षात झालेला हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला मानला जात आहे. या हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना तब्बल ३५० किलो आयईडी स्फोटकांचा वापर केला होता. सीआरपीएफचा ताफा जात असलेल्या एका कारमध्ये ही स्फोटके भरून ठेवण्यात आली होती. सीआरपीएफचा ताफा जवळ आल्यानंतर फिदाईन दहशतवाद्याने ही कार सीआरपीएफच्या बसवर नेऊन आदळली. यावेळी झालेल्या भीषण स्फोटात ३० जवानांचा जागीच मृत्यू झाला. या स्फोटानंतर दहशतवाद्यांकडून गोळीबारही करण्यात आला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की, सीआरपीएफच्या बसचे अक्षरश: तुकडे झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सीआरपीएफच्या या ताफ्यात एकूण ७८ वाहने होती. त्यामधून २५०० जवान प्रवास करत होते. यापैकी बहुतांश जवान नुकतेच सुट्टीवरून परतले होते. हे सर्वजण श्रीनगरहून जम्मूच्या दिशेने जात होते. यावेळी अवंतीपोरा भागातील गोरीपोरा येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला झाला. 


या हल्ल्यानंतर दक्षिण काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफच्या अन्य तुकड्यांना अवंतीपोरा येथे पाठवण्यात आहे. तसेच जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरु करण्यात आल्याचे समजते. 


तर दुसरीकडे दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल सातत्याने पुलवामातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.