श्रीनगरमध्ये पोलीस पथकावर हल्ला, प्रत्युत्तर देताना एक दहशतवादी ठार
Terrorist Attack : श्रीनगरमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. (Attack on Police Team) या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत पोलीस कर्मचाऱ्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे.
जम्मू : Terrorist Attack : श्रीनगरमध्ये पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. (Attack on Police Team) या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत पोलीस कर्मचाऱ्यांनी एका दहशतवाद्याला ठार केले आहे. ठार झालेला दहशतवादी (Terrorist) लष्करचा असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी त्याच्याकडून शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. त्याचवेळी श्रीनगरच्या मेथन भागात सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली आहे. दरम्यान, गृहमंत्री अमित शाह आणि उपराज्यपाल मनोज सिन्हा आज काश्मीरच्या सुरक्षेबाबत बैठक घेणार आहेत.
Identity Card वरुन झाली ओळख
मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनगरच्या नाटीपोरा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांच्या टीमवर हल्ला (Terrorist Attack) केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनी केलेल्या कारवाईत लष्करचा एक दहशतवादी ठार झाला. ठार झालेल्या दहशतवाद्याकडे सापडलेल्या ओळखपत्रानुसार त्याची ओळख लष्कर-ए-तय्यबा या बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनेशी संबंधित असलेल्या ट्रेन्झ शोपियानचा आकीब बशीर कुमार म्हणून झाली आहे.
वातावरण बिघडवण्याचे षड्यंत्र
सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला असून दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी खोऱ्यातील शांततामय वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. अलीकडेच, गुरुवारी श्रीनगरच्या ईदगाह परिसरात एका सरकारी शाळेतील दोन शिक्षकांसह एका महिला मुख्याध्यापकाची दहशतवाद्यांनी गोळ्या घालून हत्या केली. दहशतवाद्यांनी शाळेत प्रवेश करून सुपिंदर कौर यांची हत्या केली होती. सुपिंदर कौर श्रीनगरच्या अलोची बाग येथील रहिवासी आरपी सिंह यांच्या पत्नी होत्या आणि एका सरकारी शाळेच्या प्राचार्या होत्या.
प्रत्येक कृतीला चोख प्रत्युत्तर देईल
खोऱ्यामध्ये गेल्या पाच दिवसांत सात नागरिकांचा बळी गेला आहे.त्यापैकी सहा शहरात ठार झाले आहेत. मृतांपैकी चार अल्पसंख्याक समाजातील होते. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह म्हणतात की, दहशतवादी भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि येथील सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, सुरक्षा दले दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत आहेत आणि त्यांना देत राहतील.