Thackeray Group Slams PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजस्थानमधील भाषणात काँग्रेसवर भ्रष्टाचारावरुन केलेल्या टीकेचा समाचार ठाकरे गटाने घेतला आहे. पंतप्रधान मोदी हे ज्यांना भ्रष्टाचारी म्हणतात नंतर तोच पक्ष किंवा तेच नेते भाजपासोबत जातात असं थेट राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवार यांचा उल्लेख करत ठाकरे गटाने म्हटलं आहे. इतर पक्षांना ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ म्हणणारा भाजपा पक्षच ‘लूट का मॉल’ आहे, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे. काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान’ असेल तर आजची भाजप म्हणजे ‘लूट का मॉल’ आहे, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.


लुटीचा माल विकत घेऊन भाजप आपले घर का भरत आहे?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान, झूठ का बाजार’ असा घणाघात पंतप्रधान मोदी यांनी राजस्थानमध्ये बोलताना केला. हे त्यांचे बोलणे नेहमीचेच आहे. पंतप्रधानांना खरं तर स्वपक्षाविषयी बोलायचे होते, पण चुकून तोंडातून काँग्रेसचे नाव आले. काँग्रेस किंवा अन्य राजकीय पक्ष ‘लूट की दुकान’ असेल तर तो लुटीचा माल विकत घेऊन भाजप आपले घर का भरत आहे? याचा खुलासा पंतप्रधान मोदी यांनी करायला हवा," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.


हाच भाजपचा राजकीय शिष्टाचार


"मुळात भाजप हाच आता राष्ट्रीय चोर बाजार झाला आहे. चोरीचा, लुटीचा माल विकत घेणारा पक्ष म्हणून तो बदनाम झाला आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री फडणवीस हे मोदींचीच थुंकी झेलून म्हणतात, ‘‘मी पुन्हा येईन, असे म्हणालो होतो. येताना दोघांना घेऊन आलो.’’ हे दोघे म्हणजे शिंदे-अजित पवार. दोघांवर अमाप भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. म्हणजे ‘‘येताना भ्रष्टाचाराचा व लुटीचा माल घेऊन आलो,’’ असेच फडणवीस यांना सांगायचे असावे," अशी खोचक टीका ठाकरे गटाने केली आहे. "पंतप्रधान मोदी आठ दिवसांपूर्वी म्हणाले होते, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस हा सगळ्यात भ्रष्ट पक्ष आहे.’’ त्याच राष्ट्रवादी पक्षाला त्यांनी लगेच मांडीवर घेतले. आता मोदी यांनी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यावरदेखील हल्ला केला. केसीआर सरकार म्हणजे सर्वात भ्रष्ट सरकार असा आरोप मोदी यांनी केला. आता आम्हाला भीती वाटते ती केसीआर पक्षाची. कारण मोदी ज्या पक्षाला भ्रष्ट मानतात तो पक्ष पुढच्या काही काळात भाजपचा मित्र बनून सत्तेत सहभागी होतो किंवा त्या भ्रष्ट पक्षात फूट पाडून त्यातला सगळ्यात भ्रष्ट गट भाजपवासी केला जातो. हाच भाजपचा राजकीय शिष्टाचार बनला आहे," अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.


पंतप्रधानांनी अद्यापि मणिपूरच्या हिंसेवर तोंड उघडले नाही. यास काय म्हणावे?


"काँग्रेस पक्ष हा भ्रष्टाचारी, पण ज्यांच्यामुळे काँग्रेस भ्रष्टाचारी झाली ते सर्व लोक आज भाजपात जाऊन शिष्टाचारी झाले. भाजपला त्यांची ‘लूट की दुकाने’ चालविण्यासाठी इतर पक्षांतल्या ‘चोरां’ची गरज आहे काय? व अशा चोरांच्या निवडीसाठी त्या पक्षाने एखाद्या राष्ट्रीय समितीचे गठन केले आहे काय?" असा प्रश्न ठाकरे सरकारने विचारला आहे. "अलीकडच्या काळात पंतप्रधान मोदी यांनी आपल्या पदाच्या प्रतिष्ठेचे भान अजिबात ठेवलेले दिसत नाही. तेलंगणामध्ये भविष्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे तेथील मुख्यमंत्र्यांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. उद्या हेच ‘केसीआर’ किंवा त्यांचा पक्ष फुटून भाजपात सामील झाला तर ‘केसीआर’ हे मोदींसाठी सगळ्यात सचोटीचे ठरतील. मध्य प्रदेशात भाजपचे लोक दलितांवर अत्याचार करीत आहेत. एका दलितावर भाजपचा मस्तवाल पदाधिकारी उघडपणे ‘लघुशंका’ करीत असल्याच्या चित्राने देशाची जगभरात छीथू झाली. पंतप्रधान मोदी यांनी यावर अद्याप काही भाष्य केले नाही. भोपाळमध्येच एका दलित तरुणास भाजपच्या कार्यकर्त्याने स्वतःचे तळवे चाटायला लावले. हे प्रकरणदेखील भयंकर आहे. प. बंगालातील ग्रामपंचायत निवडणुकांत हिंसाचार झाला, त्यात 11 जण ठार झाले. हे गंभीरच म्हणावे लागेल, पण मणिपुरात भाजपचे सरकार असून तेथील हिंसाचार दोन महिन्यांपासून थांबायचे नाव घेत नाही. दोनशेच्या आसपास लोक त्या राज्यात मरण पावले. पंतप्रधानांनी अद्यापि मणिपूरच्या हिंसेवर तोंड उघडले नाही. यास काय म्हणावे?" असा प्रश्नही ठाकरे सरकारने उपस्थित केला आहे.


मोदी इतरांना चोर म्हणत आहेत हे आश्चर्यच


"पंतप्रधान मोदींच्या काळात खलिस्तानी चळवळीने पुन्हा डोके वर काढले. कॅनडापासून लंडनपर्यंत खलिस्तानी समर्थक आमच्या दूतावासासमोर जमून देशविरोधी नारे देतात, कुठे दूतावासांची तोडफोड करतात व सरकार याबाबत पूर्णपणे मौन बाळगून आहे. पंतप्रधान मोदी हे दुतोंडी असल्यासारखे वागतात व बोलतात. आपल्या लोकांचा भ्रष्टाचार झाकून ठेवायचा व राजकीय विरोधकांना भ्रष्टाचारी म्हणून बदनाम करायचे हे त्यांचे धोरण आहे. अदानी यांच्या भ्रष्टाचारास व लुटमारीस थेट पंतप्रधान मोदी यांचेच पाठबळ आहे व या लुटीचे आकडे मोठे आहेत. अदानी प्रकरणाची साधी चौकशी करायला मोदी व त्यांचे सरकार तयार नाही. काँग्रेस म्हणजे ‘लूट की दुकान’ असेल तर आजची भाजप म्हणजे ‘लूट का मॉल’ आहे. जेथे भाजपची सत्ता नाही ती राज्ये केंद्राने पाठवलेला पैसा हडप करतात असा पंतप्रधान मोदी यांचा दावा आहे, पण मोदीसाहेब, अदानी यांच्या बाबतीत राहुल गांधी यांनी जे पाच-दहा प्रश्न विचारले त्यावर उत्तर द्यायला तयार नाहीत. भाजपचा सध्याचा डोलारा म्हणजे लुटीचा आणि हपापाचाच माल आहे. आताचा भाजप हाच 70-75 टक्के लुटीचा आणि चोरीचा माल भरलेला पक्ष बनला आहे व मोदी इतरांना चोर म्हणत आहेत हे आश्चर्यच आहे," असं ठाकरे गटानं 'सामना'मधून म्हटलं आहे.


चोर बाजाराचे खरे मालक भाजपवालेच


"पंतप्रधान महागाईवर बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत, मणिपुरातील हिंसाचारावर बोलत नाहीत, चीनच्या घुसखोरीवर बोलत नाहीत. त्यांची पिपाणी वाजतेय ती त्यांच्या विरोधकांची सरकारे जेथे आहेत त्या राज्यांच्या विरोधात. हे ‘इतिहास पुरुषा’चे लक्षण नाही. मोदी हे व्यापारी डोक्याचे आहेत असे त्यांनीच मागे कबूल केले. व्यापारी राजा जसा वागतो तसेच ते वागत आहेत, पण त्यांच्या व्यापाराचा फायदा संपूर्ण देशाला होत नसून फक्त गुजरात याच एका राज्याला होतोय. भ्रष्टाचाऱ्यांना व्यापारी वृत्तीने पाठीशी घालणे हा ‘गुजरात पॅटर्न’ आहे. संपूर्ण देशात तो लागू होताना दिसतोय. लुटीचा माल आणि चोरांचा बाजार हेच भाजपचे चारित्र्य बनले आहे आणि या चोर बाजाराचे खरे मालक भाजपवालेच झाले आहेत. ते आता स्पष्टच दिसत आहे. ‘सब भूमी गोपाल की’ याप्रमाणे ‘सब चोर भाजप के’ असेच आता वाटते," असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.