नेपाळमध्ये 4 तर सिक्कीमध्ये 4 ठाणेकरांचा एकाच दिवसात दुर्दैवी मृत्यू
एकाच दिवसात 8 ठाणेकरांनी गमावली जीव
ठाणे : नेपाळमधील बेपत्ता आणि त्यानंतर उघड झालेल्या विमान अपघातात आणि ईशान्येकडील भारतीय राज्य सिक्कीममधील अपघातांमध्ये ठाण्यातील एकूण आठ नागरिकांचा मृत्यू झाल्याचं आता स्पष्ट होतंय.
नेपाळमधील पोखरातून टेक ऑफ घेतल्याच्या अवघ्या काही मिनिटांत तारा एअरलाईन्सचं एक विमान बेपत्ता असल्याची बातमी आली. त्यानंतर या विमानाचा अपघात झाल्याचं स्पष्ट झालं.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार विमानात असलेले अशोक कुमार त्रिपाठी, त्यांच्या पत्नी वैभवी बांदेकर त्रिपाठी आणि त्यांची मुलं धनुष्य आणि रितिका हे ठाण्यातील कापूरबावडी मधील रहिवासी असल्याचं आता समोर येतंय.
नेपाळच्या अधिकाऱ्यांकडून केल्या गेलेल्या शोधमोहिनेदरम्यान विमानातील 22 जणांच्या जीविताबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. दरम्यान विमानाचे जळते अवशेष सापडले असल्याची माहितीही या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली होती.
दुसरीकडे शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सिक्कीमच्या केदूंग भीर भागात आणखी एक भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात रस्त्यावरून गाडी स्किड होऊन थेट काही शे फूट दरीत कोसळल्याची घटना घडलीये. या भीषण दुर्घटनेतही ठाणेकर नागरिकांचा मृत्यू गेल्याचं आता स्पष्ट होतंय. या अपघातात सुरेश पुनामिया, तोरल पुनामिया, देवांशी पुनामिया आणि हिरल पुनामिया या एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे.