मुंबई : पुळपुट्या नीरव मोदीच्या संग्रहातील एकूण ६८ चित्रांपैकी ५५ चित्रांची मंगळवारी लिलावात विक्री करण्यात आली. त्याच्या संग्रहात असणाऱ्या या चित्रांमधील अवघ्या दोन चित्रांचीच किंमत ही ३६ कोटींच्या घरात असल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. ज्यापैकी एक चित्र हे २२ कोटी, तर दुसरं चित्र १४ कोटींना विकलं गेलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नीरव मोदीच्या संग्रही असणाऱ्या या चित्रांपैकी एक, व्ही.एस. गायतोंडे यांचं चित्र  'Untitled oil on canvas' हे २२ कोटींना, तर राजा रवी वर्मा यांनी रेखाटलेल्या 'The Maharaja of Tranvancore', हे चित्र तब्बल १४ कोटींना विकलं गेलं. एकूण ५५ चित्रांच्या लिलाव प्रक्रियेतून जवळपास ५४.८४ कोटी इतकी रक्कम मिळाली असून, ती रक्कम आयकर विभागाकडे देण्यात आल्याचं कळत आहे. 



नीरव मोदीच्या संग्रही असणाऱ्या दोन महत्त्वाच्या चित्रांव्यतिरिक्त इतरही चित्रांवर लाखांच्या घरात बोली लावली गेली. ज्यामध्ये एफएन सूजा यांच्या चित्रावर ९० लाखांची बोली लावण्यात आली. तर, चित्रकार जोगेन चौधरी यांच्या चित्रावर ४६ लाखांची बोली लावण्यात आली. भूपेन खाखर आणि के.के. हैबर यांच्या चित्रांवर अनुक्रमे ३५ आणि ४० लाख रुपयांची बोली लावण्यात आली. चित्रांच्या लिलावातून मिळालेली सर्व रक्कम ही आयकर विभागाला देण्यात आली असून, त्यांच्याकडून (आयकर विभागाक़ून) एकूण ९५ कोटी रुपये कर्जाची वसुली होणं अपेक्षित आहे. 


सध्याच्या घडीला पीएनबी बँकेला १३ हजार कोटींचा चुना लावून फरार होणारा नीरव हा लंडनमधील वेस्टमिन्स्टर पोलिसांच्या ताब्यात आहे. भारताच्या विनंतीनंतर अटकेची कारवाई करत त्याला स्थानिक न्यायालयासमोर सादर करण्यात आलं. ज्यानंतर पुढे २९ मार्चला या प्रकरणीची पुढील सुनावणी होणार आहे.