हवामान विभागाकडून `या` भागात मुसळधार पावसाची शक्यता
मुसळधार पावसासह वादळाची शक्यता
नवी दिल्ली : हवामान विभागाकडून आगामी दिवसांतील पर्जन्यमानाविषयी महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे. त्यांच्याकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार लक्षद्वीप, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, तमिळनाडू, पुद्दुचेरी तसंच कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि केरळच्या काही भागात मुसळधार पावसासह वादळाची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मालदीव, लक्षद्वीप आणि आसपासच्या भागात प्रतितास ६० किलोमीटर अशा वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता असल्याचंही सांगण्यात आलं आहे. वादळी वाऱ्यांचा वेग पाहता मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण भागात शेतीचं मोठं नुकसान केलं आहे. भातशेती, द्राक्षबागा, झेंडूची फुलं, कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग तसंच कांदा पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. या पावसाने हाता-तोंडाशी आलेलं पिक वाया गेलं असल्याने शेतकऱ्यांकडून, शेतीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.