भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येबाबत काँग्रेसचा मध्यप्रदेश सरकारवर आरोप
राष्ट्रसंत म्हणून मान्यता मिळालेले भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसने या आत्महत्येबाबत मध्यप्रदेश सरकारवर आरोप केलेत
नवी दिल्ली : राष्ट्रसंत म्हणून मान्यता मिळालेले भय्यूजी महाराज यांच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. काँग्रेसने या आत्महत्येबाबत मध्यप्रदेश सरकारवर आरोप केलेत. भय्यूजी महाराजांवर मंत्रीपद घेण्यासाठी सरकारने दबाव आणला होता. भय्यूजी महाराजांचा याला विरोध होता. त्याच दबावामुळे महाराजांनी आत्महत्या केल्याचा संशय काँग्रेसने व्यक्त केलाय.
सरकारी सुविधा घेण्यासाठी दबाव
भय्यू महाराज यांच्यावर सरकारी सुविधा घेण्यासाठी दबाव होता, असा दावा मध्यप्रदेश काँग्रेसनं केलाय. त्यांना शिवराजसिंग चौहान यांनी मंत्रिपद देऊ केलं होतं. त्यांनी मंत्रिपद स्वीकारलं असलं तरी सर्व सुविधा मात्र सरकारला परत केल्या होत्या. त्यामुळे यावर बोट ठेवत काँग्रेसनं सीबीआय चौकशीची मागणी केलीये.
स्वत:वर गोळी झाडून जीवन संपवले
भय्यूजी महाराज यांनी इंदूरमधील सिल्वर स्प्रिंग या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी स्वत:वर गोळी झाडून स्वत:च जीवन संपवले. कौटुंबीक वादाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना उपचारांसाठी बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दिग्गजांसोबत त्यांची उठबस
भय्यूजी महाराज सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात अतिशय सक्रीय होते. राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी, त्यांच्यातील समेट, आंदोलने, उपोषणे यांच्यातील मध्यस्थ म्हणून त्यांनी अनेकदा महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. अध्यात्मिक क्षेत्रात ते प्रसिद्ध होते. राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत त्यांची उठबस असायची.
काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशातील शिवराज सिंह सरकारने त्यांना मंत्रिपदाचा दर्जा दिला होता. भय्यू महाराजांच्या आश्रमात कलाकार, गायक, उद्योगपती, राजकारण इत्यादी अनेक दिग्गज व्यक्तींचा त्यांच्या आश्रमात राबता असायचा. महाराष्ट्राच्या राजकारणात भय्यूजी महाराजांचा बराच बोलबाला होता. राजकारणात अनेकदा यशस्वी मध्यस्थी करण्यासाठी भय्यूजी महाराज ओळखले जायचे.