Rajdhani Express @50 : पन्नाशीची राजधानी प्रवाशांचं तोंड गोड करून मार्गस्थ
राजधानीला प्रवाशांच्या वर्तुळात विशेष स्थान.
कोलकाता : भारतीय रेल्वेच्या इतिहासात जवळपास पन्नास वर्षांपूर्वी अशी क्रांती झाली , जिने लांब पल्ल्याच्या रेल्वे प्रवासाचा खऱ्या अर्थाने कायापालट केला. या कायापालटाचं नाव होतं, राजधानी एक्स्प्रेस. वेग आणि अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण अशा संपूर्ण वातानुकूलित राजधानी एक्स्प्रेसला पन्नास वर्षे पूर्ण झाली आहे. पन्नास वर्षांपूर्वी या रेल्वेने हावडा स्थानकातून आपल्या पहिल्या प्रवासाला सुरुवात केली होती.
पूर्वीय रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पहिला प्रवास १९६९ मध्ये करण्यात आला होता. ज्यामध्ये १ हजार ४५० किमीचं अंतर १७ तास २० मिनिटांमध्ये पूर्ण करण्यात आलं होतं. अशा या राजधानीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी म्हणून रेल्वेला गोंड्यांच्या माळांनी सजवण्यात आलं होतं. हावडा येथून निघताना राजधानी एक्स्प्रेसच्याच तीन माजी कर्मचाऱ्यांनी झेंडा दाखवला आणि ही पन्नाशीची वेगवान रेल्वे एका खास प्रवासासाठी मार्गस्थ झाली.
एका खास दिवसाच्या निमित्ताने प्रवासाला निघालेल्या या रेल्वेत असणाऱ्या प्रवासांचंही तोंड गोड करण्यात आलं. सर्व प्रवाशांना पूर्वीय रेल्वे प्रशासनाकडून आईस्क्रीमसोबतच रसगुल्ला देण्यात आल्याची माहिती आयआरसीटीसीच्या पूर्वीय विभागाचे कार्यकारी व्यवस्थापक देबाशिष चंद्रा यांनी दिली.
राजधानी ही पहिली अशी रेल्वे आहे जिच्या तिकीट दरांतच रेल्वे प्रवासादरम्यान देण्यात येणाऱ्या खाद्यपदार्शांचीही किंमत आकारली जाते. या रेल्वेच्या पन्नास वर्षे पूर्ण करण्याच्या प्रवासाच्या निमित्ताने प्रवाशांना खास नॅपकीन आणि भेटकार्डही देण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. भारतीय रेल्वेचं अफाट जाळं आणि त्यात धावणाऱ्या रेल्वे म्हणजे प्रवाशांसाठीही जिव्हाळ्याचा विषय. त्यातही राजधानीला प्रवाशांच्या वर्तुळात विशेष स्थान. त्यामुळे पन्नाशीच्या निमित्ताने राजधानीतून सफर करणाऱ्यांचा हा प्रवास खऱ्या अर्थाने खास आहे, असंच म्हणावं लागेल.