मुंबई : बुधवारी यास चक्रीवादळ (Yass Cyclone) ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱ्यांवर धडकणार आहे. यापूर्वी बर्‍याच भागात पाऊस सुरू झाला आहे. ओडिशामधील भुवनेश्वर, बंगालमधील चांदीपूर आणि दिघा येथे पाऊस पडत आहे. दुसरीकडे, बिहार आणि झारखंडसह अनेक राज्यात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चक्रीवादळ यास आता धोकादायक रुप धारण करु लागला आहे. त्यामुळे बंगालमधील मेदिनीपूर, 24 परगणा आणि हुगळी येथेही पावसाने हजेरी लावली. एनडीआरएफने पूर्व मेदिनीपूर आणि दिघामधील अनेक भाग रिकामे केले होते.


ताशी 165 किमी वेगाने वाहणार वारे


बुधवारी पारादीप आणि सागर बेट दरम्यान यास वादळ येण्याची शक्यता आहे. यामुळे ताशी 165 किमी वेगाने वारे वाहतील तर 2 मीटर ते 4.5 मीटर पर्यंत लाटा उसळू शकतात. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, समुद्रकिनाऱ्यावर धडकण्यापूर्वी यास खूप धोकादायक रुप घेऊ शकतो.


यास वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती निवारण पथके पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये तैनात आहेत. हवाई दल आणि नौदलाने त्यांचे काही हेलिकॉप्टर आणि बोटी मदतकार्यासाठी राखीव ठेवले आहेत. वादळामुळे बालासोर, भद्रक, केंद्रपारा, जगतसिंगपूर, मयूरभंज आणि केनझार जिल्ह्यांना उच्च जोखीम विभाग म्हणून घोषित करण्यात आले आहे.


बंगालमध्ये 10 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले


यास चक्रावादमुळे पश्चिम बंगालमधील कोलकाता, हावडा, हुगळी येथे बुधवारी जोरदार वारे वाहू शकतात. उत्तर आणि दक्षिण 24 परगणा येथे ताशी 90 ते 100 किमी वाऱ्याचा वेग अपेक्षित आहे. हा वेग 120 किमी प्रतितास पर्यंत वाढू शकतो. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की राज्य सरकार 10 लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात गुंतले आहे. यासचा प्रभाव अम्फानच्या वादळापेक्षा खूप जास्त असेल.


मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे


या वादळामुळे बिहार आणि झारखंडलाही इशारा देण्यात आला आहे. येत्या 2-3 दिवसांत राज्यात बर्‍याच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. विभागाने 27 आणि 28 मेसाठी ऑरेंज अलर्ट देखील जारी केला आहे. दुसरीकडे, झारखंडमध्ये यासंदर्भात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याच्या दक्षिण आणि मध्य भागात बुधवारी आणि गुरुवारी मुसळधार पाऊस पडेल. पूर्व सिंहभूम आणि रांची जिल्ह्यात एनडीआरएफचे पथकही तैनात करण्यात आले आहेत.