नवी दिल्ली : मतदानयंत्राच्या हॅकिंगचा मुद्दा खरंतर विद्यमान सरकारसाठी खूपच अडचणीचा ठरायला हवा होता. पण काँग्रेसनं लंडनमधून हा मुद्दा उकरून काढताना इतक्या चुका केल्या की आता हे प्रकरण त्यांच्याच अंगाशी येण्याची भीती आहे. लंडनमधील पत्रकार परिषदेत भारतीय मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आला. लोकसंख्येच्या दृष्टीनं जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीच्या सर्वात महत्वाच्या उत्सवाला गालबोट लावण्यात आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकार परिषद लंडनमधील इंडियन जर्नलिस्ट असोशिएशननं आयोजित केली होती. आयजेएचे अध्यक्ष आशिष रे हे नेताजी सुभाष चंद्र बोस यांचे वंशज आहेत. सुभाषबाबूंच्या भारतातील वंशजांची भाजपशी जवळीक असली. तरी आशिष रे मात्र काँग्रेसचे जुने समर्थक आहेत. मतदानयंत्राच्या हॅकिंगाचा दावा करणारा सय्यद शुजा हा भारताचाच नागरिक आहे. शुजा काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतातच वास्तव्यास होता. शिवाय मतदान यंत्र बनवणारी कंपनी बीईएलमध्ये नोकरी केल्याचा त्यानं दावा ही केला आहे.


विशेष म्हणजे पत्रकार परिषदेत शुजा प्रत्यक्ष उपस्थित नव्हता. तो अज्ञात स्थळी बसून लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे संवाद साधत होता. कालच्या पत्रकार परिषदेत माजी केंद्रीय कायदा मंत्री आणि काँग्रेसचे राज्यसभा खासदार कपिल सिब्बल उपस्थित होते. त्यामुळे पत्रकार परिषदेमागे काँग्रेसच असल्याचा दावा आता सत्ताधारी करू लागले आहेत.


लंडनमधील पत्रकार परिषदेत मतदान यंत्रावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला पण त्यामुळे भाजपचं नुकसान होण्यापेक्षा फायदाच होण्याची चिन्हं आहेत. पत्रकार परिषदेनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात भाजपनं मतदान यंत्र कशी हॅक केली?. मतदान यंत्रणा हॅक झाल्याचं शुजाला माहित होतं, तर तो कालपर्यंत गप्प का होता?


काँग्रेसचे खासदार कपिल सिब्बल एकटेच या पत्रकार परिषदेत काय करत होते?. भारताविषयीच्या इतक्या महत्वाच्या मुद्द्यावर इंडियन जर्नलिस्ट असोशिएशननं शुजाला लंडनमध्ये व्यासपीठ का दिलं?. 2018 मध्ये काँग्रेसनं ज्या विधानसभा निवडणुका जिंकल्या त्यावेळी मतदानयंत्रात छेडछाड झाली नाही का? हे आणि असे अनेक प्रश्न सामान्यांच्या मनात आहेत. आता येत्याकाळात सत्ताधारी आणि विरोधकांनी मतदान प्रक्रियेविषयी मांडलेला खेळखंडोबा कधी आणि कसा आवरतात. हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे.