दिल्लीत लॉकडाऊन वाढणार नाही, सरकारचा निर्णय
सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे.
नवी दिल्ली : सध्या देशात कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. दिल्लीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे दिल्लीत अतिशय चिंताजनक वातावरण आहे. दरम्यान दिल्लीत लॉकडाऊन वाढवण्यात येणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या होत्या. परंतु आता दिल्लीत लॉकडाऊन वाढणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिल्लीत लॉकडाउन वाढवला जाणार नसल्याचं सांगितलं आहे. एएनआयशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
गुरूवारी दिल्लीमध्ये ६५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. याठिकाणी २५ मिनिटाला एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दिल्लीत कोरोनामुळे मृत पावलेल्या रुग्णांच्या अंत्यसंस्कारासाठी ४ स्मशानघाट आणि २ कब्रस्तानची व्यवस्था करण्यात आली आहे.
धक्कादायक म्हणजे , भारतात कोरोनाचे २,९७,२०५ रुग्ण आहेत. आता भारत जगातील चौथा सर्वाधिक प्रभावित देश ठरला. एका दिवसात भारताने स्पेन आणि ब्रिटनला मागे टाकले आहे. याआधी भारताने चीनलाही मागे टाकले होते. दिल्लीत ३२८१० संसर्ग झालेल्यांची संख्या आहे.