नवी दिल्ली: काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला हे अत्यंत घृणास्पद कृत्य आहे. मात्र, आम्ही भारतीय जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पुलवामा हल्ल्यानंतर त्यांनी ट्विटरवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आम्ही या भ्याड हल्ल्याचा निषेध करतो. हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी संपूर्ण देश भक्कमपणे उभा आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांची प्रकृती लवकरात लवकर बरी होऊ दे, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


उरी येथील हल्ल्यानंतर भारतीय लष्करावर झालेला हा सर्वात मोठा हल्ला आहे. त्यामुळे देशभरात मोठी खळबळ माजली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सोशल मीडियावर अनेकजण मोदीजी पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक हवाय, अशी मागणी अनेकजण करत आहेत. दरम्यान, या हल्ल्यानंतर दिल्लीतील घडामोडींना प्रचंड वेग आला आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल सातत्याने पुलवामातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. काही वेळापूर्वीच अजित डोवाल यांनी पंतप्रधानांशी चर्चा केली. यानंतर डोवाल यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.