जम्मू-काश्मीर : दहशतवादी किती उलट्या काळजाचे असतात याच दर्शन आज काश्मीरात घडले. एका मातेचा आपल्या मुलासाठी आर्त टाहो सगळ्या जगाने आज पाहिला. पण दहशतवाद्यांनी मातेच्या टाहोकडे दुर्लक्ष करत ११ वर्षांच्या मुलाला गोळ्या घालून ठार मारले. दहशतवाद्यांच्या ताब्यात सापडलेल्या आपल्या मुलाला सोडून द्यावे यासाठी ही काश्मिरी महिला आर्त टाहो करत होती. पण दहशतवाद आणि माणुसकी या गोष्टी एकत्र नांदूच शकत नाहीत हे पुन्हा एकदा दिसून आलं. दहशतवाद्यंनी मानवी ढाल म्हणून वापरलेल्या या मुलाची गरज संपल्यावर हत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा जिहाद नाही. हा क्रूरपणा आहे असे या आईने दहशतवाद्यांना दरडावले. आमच्या घरात आम्ही तुम्हाला खाऊ पिऊ घातले आहे. कृपा करून माझ्या मुलाला सोडा अशी आर्त हाक ही माता दहशतवाद्यांना घालत होती. पहाटे पावणेसहा वाजता बांदीपोरा इथे हाजीन इथे सुरू असलेल्या चकमकीत हा प्रकार घडला. चकमकीत आतीफ मीर मुलगा दहशतवादी आणि आर्मीच्या गोळीबारात मध्येच सापडला होता. त्या मुलाला दहशतवाद्यांनी ताब्यात घेऊन त्याची मानवी ढाल करून दहशतवादी सैन्यावर गोळीबार करायला लागले. हा प्रकार लक्षात आल्यावर भारतीय लष्कराने समोर शत्रू दिसत असून आपल्याकडून गोळीबार थांबवला. 


लष्कराने या मुलाच्या मातापित्यांना घटनास्थळावर आणून जीपच्या आडून त्या मातेला दहशतवाद्यांना मुलाला सोडून देण्याचे आवाहन करायला लावले. मात्र मातेचा टाहो ऐकूनही दहशतवाद्यांचं काळीज द्रवल नाही. दहशतवाद्यांनी आतीफ मीरची गरज संपल्यावर गोळ्या घालून त्याला ठार मारले. दहशतवादी क्रूर कृत्य, भ्याडपणा पुन्हा एकदा जगासमोर आला. लहान मुलाचा वापर ढालीसारखा करून जिहादच्या नावाखाली केली जाणारी भोंदुगिरी जगासमोर आली. पण त्याच वेळी भारतीय लष्करानं धैर्य, संयम आणि मानवता याचं दर्शन जगासमोर घडवलंच पण त्याचवेळी आपली जबाबदार भूमिकाही काश्मिरी जनतेला दाखवून दिली. 


दरम्यान, नवी दिल्लीमध्ये जैश ए मोहम्मदच्या जहाल अतिरेक्याला अटक करण्यात आलीये. सज्जाद खान असं त्याचं नाव आहे. तो पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार मुदस्सीर खान याचा जवळचा साथीदार आहे. सज्जादही पुलवामाचाच रहिवासी आहे. पुलवामा हल्ल्यात त्याचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काल रात्री उशिरा दिल्लीच्या लजपत राय बाजाराच्या परिसरात सज्जादला अटक करण्यात आली. मुदस्सीरच्याच सांगण्यावरून सज्जाद दिल्लीत आला होता. शाल विक्रेता म्हणून तिथं वावरताना जैशसाठी स्लिपर सेल तयार करण्याचं काम त्याला देण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.