मुंबई : बलशाली असल्याचा टेंभा मिरवणा-या चिनी लष्कराचा खरा चेहरा उघड झालाय. लष्करी तज्ज्ञांनी खरंतर चिनी लष्कराची ही दुबळी बाजू याआधीच उघड केली होती... भारताचे सीडीएस जनरल रावत यांनी आज यावर शिक्कामोर्तब केलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगात तिसऱ्या क्रमांकाचं लष्कर असल्याचा टेंभा चीन नेहमीच मिरवत असतो. पण चिनी लष्कराची दुबळी बाजू गलवान संघर्षानंतर जगासमोर आली आहे. चिनी लष्कराची ही दुबळी बाजू सीडीएस जनरल बिपीन रावत यांनीही पुन्हा एकदा उघड केलीय. चीनला सणसणीत टोलाच त्यांनी लगावलाय. चीनी सैनिकांना आणखी चांगलं प्रशिक्षण दिलं जाण्याची आणि उत्तम तयारी ठेवण्याची आवश्यकता आहे, असं बिपीन रावत यांनी म्हटलंय.


चिनी सैन्याच्या बीजिंगमधल्या परेड, मोठमोठी शस्त्रास्त्र घेऊन केलेलं शक्तीप्रदर्शन आणि प्रत्यक्षातली त्यांची युद्धभूमीतली कामगिरी यात जमीन आसमानाचा फरक गलवानने दाखवला. गलवान संघर्षानंतर तिथल्या अतिशय प्रतिकूल, जीवघेण्या वातावरणात चिनी सैनिक टिकावू धरू शकले नाहीत. अतिउंचीवरील लढाईत चिनी मार खात असल्याचं जगाने पाहिलं. 


चीनने १९६२ नंतर हिमालयात युद्ध पाहिलेलं नाही. तर भारतीय सैन्य काश्मीरमध्ये सातत्याने युद्धभूमीजन्य स्थितीतच आहे. माऊंटेनिअरींग वॉरफेअरकडे चिनी लष्कराचं दुर्लक्ष केलं. तर १९६२ च्या पराभवानंतर भारताने माऊंटेनिअरींग वॉरफेअरचं प्रशिक्षण अतिशय सक्षम केलं. चिनी सैनिक हे सिव्हिलिअन बॅकग्राऊंडमधले आहेत. भारतीय सैनिक पूर्णवेळ सैनिकी पेशातले आहेत. चिनी सैनिक तात्पुरत्या सेवेसाठी सैन्यात भरती होतात. भारतीय लष्करात तात्पुरत्या सेवेचा पर्यायच नाही. चीनच्या मुख्य भूमीतल्या सैनिकांना लडाख, तिबेटचा प्रदेश तुलनेत नवा आहे. भारतीय सैनिक सातत्याने काश्मीर, लडाखमध्ये कार्यरत आहेत. 


चिनी आणि भारतीय सैनिकांच्या जडणघडणीतच प्रामुख्याने हा फरक आहे. त्यामुळे चिनी लष्कर लडाखच्या थंडीत तगच धरू शकलेलं नाही. त्यामुळे केवळ राजधानीत शक्तीप्रदर्शनं करून काही होत नाही, ती शक्ती खरोखर मनगटात असावी लागते. चीन या आघाडीवर सपशेल पराभूत झालंय हेच वास्तव आहे.