कंपनीच्या अटींवर नाही चालणार जगातील सर्वात मोठी लोकशाही, Twitter सरकारने फटकारलं
भारत सरकार आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरमधील संघर्ष कायम
नवी दिल्ली : भारत सरकार आणि मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरमधील संघर्ष कायम आहे. दरम्यान, ट्विटरच्या आरोपांवर केंद्र सरकारने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आयटी मंत्रालयाने म्हटले आहे की, ट्विटरला धमकावल्याचे आरोप खोटे आणि निराधार आहेत. दिल्ली पोलिसांनीही ट्विटरचे विधान चुकीचे असल्याचे म्हटले आहे. तसेच या वक्तव्यामागील हेतू तपासात अडथळा असल्याचे म्हटलं आहे.
सरकारने ट्विटरला फटकारले
आयटी मंत्रालयाने गुरुवारी म्हटले की, 'जाणीवपूर्वक आदेशाचे पालन न करता ट्विटर भारताची कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहे. मंत्रालयाने पुढे म्हटले आहे की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर ट्विटर आपल्या अटी लादण्याचा प्रयत्न करीत आहे.'
'टूलकिट' प्रकरणात सुरू असलेल्या चौकशीबाबत ट्विटरचे विधान खोटे असून कायदेशीर तपासात अडथळा आणण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिल्ली पोलिसांचे म्हणणे आहे. दिल्ली पोलिसांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा ट्विटरने 'पोलिसांकडून धमकावल्याचा आरोप केला आहे.
दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, काँग्रेसच्या प्रतिनिधींनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्यांनी टूलकिट प्रकरणात प्राथमिक चौकशी केली आहे.
ट्विटर काय म्हणाले
यापूर्वी, ट्विटरने एक निवेदन जारी केले होते की, आमची सेवा उपलब्ध राहण्यासाठी आम्ही भारतात लागू असलेल्या कायद्याचे अनुसरण करण्याचा प्रयत्न करू. परंतु, जसे आपण जगभर करतो. ज्या लोकांसाठी आम्ही सेवा प्रदान करतो त्यांच्यासाठी आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संभाव्य धोक्याबद्दल काळजी वाटते.'