मुंबई : चोरीचा तपास करण्यासाठी आलेल्या पोलिसांना पाहून एका तरुणाने विषप्राशन केल्याची धक्कादायक घटना श्रीरामपूर येथे घडली. विषप्राशन करण्याऱ्या तरुणाचे नाव सुजित सुभाष कपिले आहे. सुजितला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी सुजित याच्यावर गुन्हा नोदविला आहे. तसेच या घटनेला पोलिसच जबाबदार आहे, अशी तक्रार सुजितची आई सुवर्णा सुभाष कपिले यांनी केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरी-चिंचवड येथील गुन्हे शाखेच्या पथक अधिकाऱ्यांनी श्रीरामपूर येथील सोमनाथ चोबे या सोन्याच्या साखळीची चोरी करणाऱ्या आरोपीला नुकतेच पकडले. चोबे हा मोक्का खटल्यात आरोपी असून, जामिनावर त्याची सुटका झाली होती. चोबे हा सोनसाखळींची चोरी करुन लोकांना कमी पैशात विकत असे. काही दिवसांपूर्वी या सोनसाखळीचोराने एक सोनसाखळी सुजितला विकल्याची पोलिसात माहिती दिली होती. त्यामुळे ही भानगड काय आहे? याचा शोध लावण्यासाठी पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांचे पथक तपासासाठी सुजितच्या घरी आले होते. चौकशीसाठी आलेल्या पोलिसांना पाहताच सुजित विष घेऊन आला आणि 'मला अटक केली तर मी विषप्राशन करेन' अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने विषप्राशन केले. त्या ठिकाणी उपस्थित असणारी सुजितच्या आईने त्याला रुग्णालयात दाखल करा अशी विनंती केली. त्यानंतर त्याला जवळ असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर औषधोपचार चालू आहेत. 


‘पोलिसांच्या त्रासाला वैतागून माझा मुलाने विष प्राशन केले आहे. चोरीचे कोणतेच सोने घेतले नसतानाही पोलिसांनी त्याला अटक करण्याची धमकी दिली. त्यामुळे त्याने विषप्राशन केले. माझ्या मुलास काही बरेवाईट झाले तर त्याला पोलिस जबाबदार राहतील’ असे सुजितची आई यांनी दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.