नवी दिल्ली: राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीनंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता आणखीनच आक्रमक झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयात बुधवारी केंद्र सरकारने राफेल कराराची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती दिली. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ट्विट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. त्यांनी म्हटले की, राफेल प्रकरणात पंतप्रधानांविरोधात खटला दाखल करण्यासाठी पुरेसे पुरावे उपलब्ध आहेत. मोदींचा हा भ्रष्टाचार आता त्यांच्यावरील कारवाईनेच संपुष्टात येईल. राफेल प्रकरणात मोदींना गुन्हेगार ठरवणारी महत्त्वाची कागदपत्रे आता चोरीला गेल्याचा दावा सरकार करत आहे. मात्र, या माध्यमातून सरकार पुरावे नष्ट करून भ्रष्टाचारावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करत असल्याची खरमरीत टीका राहुल यांनी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राफेल विमान खरेदी व्यवहारासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या पुनर्विचार याचिकेच्या सुनावणीवेळी बुधवारी दोन्ही बाजूंनी जोरदार प्रतिवाद करण्यात आला. यावेळी केंद्र सरकारची बाजू मांडणारे अॅटर्नी जनरल के.के. वेणुगोपाल यांनी याचिकाकर्त्यांकडून सादर करण्यात आलेल्या पुराव्यांवर आक्षेप घेतला. हे पुरावे गोळा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयातील माहिती चोरण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यामुळे ही पुनर्विचार याचिका फेटाळण्यात यावी, अशी मागणी अॅटर्नी जनरल यांनी केली. 



या आरोपांना याचिककर्त्यांचे वकील प्रशांत भूषण यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. कोळसा आणि 2G घोटाळाही जागल्यांकडील कागदपत्रांमुळेच उघडकीस आले होते, अशी आठवण करुन देत त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १४ मार्चला होणार आहे.