Supreme Court : भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड (DY Chandrachud) गेल्या काही काळापासून आपल्या निर्णयांमुळे फार चर्चेत आहे. अनेक महत्त्वांच्या खटल्यावर त्यांनी सुनावणी केली आहे. डी वाय चंद्रचूड यांनी सुनावणी दरम्यान केलेल्या वक्तव्यांची सुप्रीम कोर्टाच्या बाहेर फार चर्चा होत असते. त्यामुळे त्यांच्या सुनावणीदरम्यान अनेकांचे त्याकडे लक्ष्य असते. मात्र शुक्रवारी सुनावणीदरम्यान घडलेल्या प्रकारामुळे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांचे रौद्र रुप पाहायला मिळाले. भर कोर्टात डी वाय चंद्रचूड यांनी एका वकिलाला फटकारले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या वकिलाला त्याच्या केसवर सुनावणी घ्यायची होती. त्यासाठी तो प्रयत्न करत होता आणि तेव्हाच हा सर्व प्रकार घडला. सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड  त्यांच्या कोर्टात बसले होते. त्यांच्यासमोर वकील आपली बाजू मांडत होते. दरम्यान, एका वकिलाने माईक गाठून महिला वकिलाच्या अंगावर हात टाकण्याचा प्रयत्न केला. हे पाहून सरन्यायाधीशांना राग आला. तुम्ही एका महिलेकडे गेलात आणि नंतर त्यांना तुमच्या हाताने घेरले, थोडा आदर राखा, अशा शब्दात सरन्यायाधिशांनी वकिलाला फटकारले.


वकिलाच्या वागणुकीवर डी वाय चंद्रचूड यांनी सर्वांसमोर नाराजी व्यक्त केली. "तुम्ही काय करत आहात? तुमच्या समोर एक स्त्री आहे. त्यांचा थोडा आदर दाखवा. तुम्ही घरात आणि बाहेरही असंच वागता का? माइक घेण्यासाठी तुम्ही तुमचा हात त्यांच्याभोवती ठेवत आहात. परत जा आणि उद्या या. महिलांचा आदर करा. आपण कोणत्या दिशेने जात आहोत?," अशा शब्दात डी वाय चंद्रचूड यांनी सुनावले. यानंतर कोर्टात शांतता पसरली होती.



दरम्यान, डी वाय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या महिन्यातही त्यांनी एका वकिलालाही ताकीद दिली. तुम्ही माझ्या अधिकारात लुडबुड करू नका, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले होते. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे प्रमुख विकास सिंग यांना त्यांनी एका जमिनीच्या खटल्यात सरन्यायाधिशांकडून तारीख मागितली असता डी वाय चंद्रचूड यांनी त्यांना कोर्टातून बाहेर जाण्यास सांगितले होते. या प्रकरणाची सुनावणी सामान्य केसप्रमाणेच करणार आहे, असे सरन्यायाधिश म्हणाले.


यावर विकास सिंग यांनी जर सरन्यायाधीशांची परवानगी मिळाली तर याचिका लवकर सुनावणीसाठी यावी यासाठी मी दुसऱ्या खंडपीठासमोर हे प्रकरण ठेवतो, असे म्हटले. त्यामुळे सरन्यायाधिश आणखी भडकले. "तुम्ही मला धमकावत आहात. माझ्या अधिकारांत तुम्ही लुडबुड करू नका. तुम्ही आत्ताच्या आत्ता कोर्टातून चालते व्हा," असेही डी वाय चंद्रचूड यांनी सांगितले होते.