नवी दिल्ली : साध्वीवर बलात्कार केल्याप्रकरणी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमीत राम रहीम सिंग याला पंचकूलाच्या सीबीआय कोर्टानं दोषी ठरवलंय. त्याच्याविरुद्ध शिक्षेची सुनावणी २८ ऑगस्ट रोजी होईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंरतु, बाबा राम रहीमवर अशा स्वरुपाचे गंभीर आरोप होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. राम रहीमवर कथिर स्वरुपात एका पत्रकाराच्या हत्येचाही आरोप आहे. या पत्रकारानं गुरमीतचे काळे धंदे चव्हाट्यावर आणले होते. 


या पत्रकाराचं नाव राम चंदेर छत्रपती असं होतं... हा तोच पत्रकार होता ज्यानं सिरसामध्ये दोन साध्वींवर झालेल्या बलात्काराची बातमी आपलं वर्तमानपत्र 'पूरा सच'मध्ये छापली होती. 


मीडिया सूत्रांच्या माहितीनुसार, ही बातमी छापल्यानंतर २४ ऑक्टोबर २००२ मध्ये छत्रपतीच्या घराबाहेर काही अज्ञात लोकांनी गोळ्या घालून त्याची हत्या केली होती. घरातून बाहेर बोलावत छत्रपतीवर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. 


आपल्या धाडसी आणि बातम्यांच्या विश्वासार्हतेमुळे छत्रपती पत्रकारिता क्षेत्रात चांगलेच प्रसिद्ध होते. साध्वीनं पंतप्रधानांना लिहिलेलं बेनामी पत्र आपल्या वर्तमानपत्रात छापून छत्रपती यांनी सिरसा आश्रमात होणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण चव्हाट्यावर आणलं होतं.  


पत्रकार छत्रपती यांच्या हत्येनंतर २५ ऑक्टोबर २००२ मध्ये सिरसा शहर बंद झालं होतं... तेव्हापासून छत्रपती यांचे कुटुंबीय न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत. छत्रपती यांचा मुलगा अंशुलनं आपल्या मृत पित्याला न्याय मिळवून देण्यासाठी खूप मोठा संघर्ष केलाय.