तिरुवनंतपुरम: केरळवर कोसळलेल्या अस्मानी संकटानंतर संपूर्ण देशातील नागरिक येथीस जनतेच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. अनेक राज्यांतून आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तुंची रसद तातडीने केरळच्या दिशेने धाडण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, प्रत्यक्ष पूरग्रस्त भागातही अनेकजण आपले पद आणि प्रतिष्ठेची तमा न बाळगता अत्यंत साधेपणाने नागरिकांची मदत करत आहेत. सध्या सोशल मीडियावर अशाच काही आयएएस अधिकाऱ्यांचे फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. 


या फोटोंमध्ये हे आयएएस अधिकारी एखाद्या सामान्य कर्मचाऱ्याप्रमाणे खांद्यावरून धान्याची पोती वाहून नेताना, कमरेपर्यंतच्या पाण्यात उतरुन नागरिकांना सुखरुपपणे बाहेर काढताना दिसत आहेत. साहजिकच सोशल मीडियावर या आयएएस अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे. 


हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आयएएस असोसिएशनने फोटोतील या अधिकाऱ्यांची ओळख जगाला करुन दिली. यामध्ये अन्न व सुरक्षा विभागाचे आयुक्त एमजी राजमनीकायम, वायनाडचे उपजिल्हाधिकारी एनएसके उमेश आणि पद्मनाभापुरमचे उपजिल्हाधिकारी राजगोपाल यांचा समावेश आहे. 


अनेकदा आपल्याकडे साधे नगरसेवकही सामान्यांशी मुजोरीने वागतात. मात्र, त्याचवेळी या आयएएस अधिकाऱ्यांनी अत्यंत साधेपणाने लोकांना मदत करुन नवा आदर्श निर्माण केला आहे.