या कारणाने चोराने परत केले पाकीट...
चोरांना देखील भावना असतात हे या घटनेवरून सिद्ध होते. ही घटना आहे मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील.
मध्य प्रदेश : चोरांना देखील भावना असतात हे या घटनेवरून सिद्ध होते. ही घटना आहे मध्य प्रदेशातील होशंगाबाद येथील. एका चोराने एका व्यक्तीचे पाकीट मारले. आणि ते उघडून बघितले तर त्यात १२०० रुपये, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स सारख्या महत्त्वाच्या गोष्टी व अजून एक विशेष गोष्ट होती ती म्हणजे आईचा फोटो.
पाकीटात असलेला आईचा फोटो पाहून चोर इतका भावुक झाला की त्याने ते पाकीट मालकाला परत केले. होशंगाबाद येथील अमर चौक येथे राहणाऱ्या अस्लम याचे ते पाकीट होते. चोराने कुरिअर करून ते पाकीट त्याला परत केले.
पाकीट परत मिळाल्यानंतर अस्लम याने सांगितले की, "२५ जुलैला तो पत्नीच्या उपचारांसाठी फरीदाबाद येथे गेला होता. त्याचवेळेस तो दिल्लीच्या बाजारात देखील गेला. बाजारात फिरताना त्याचे पाकीट कोणीतरी मारले. त्यानंतर त्याने दिल्लीच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली."
अस्लमने सांगितले की, "पाकीट चोरी झाल्यानंतर दोन महिन्यांनी माझ्या घरी एक कुरिअर आले. त्यात माझे हरवलेले पाकीट होते आणि त्यात एक चिट्ठी देखील होती. त्यावर एक नंबर लिहिला होता. त्या नंबरवर त्याने फोन केल्यावर पलीकडून सांगण्यात आले की, १२०० रुपये सोडून सगळ्या वस्तू परत करत आहे. कारण त्यात आईचा फोटो आहे."
त्याव्यतिरिक्त अस्लमने सांगितले की पाकीट परत करणाऱ्या चोराने सांगितले की, "मी पण माझ्या आईवर खूप प्रेम करतो. पाकिटातील आईचा फोटो पाहून तू देखील आईचा लाडका आहेस, असे दिसते. म्हणून पाकीट कुरिअरने परत पाठवत आहे." या सर्व घटनेनंतर अस्लमने दिल्ली पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पाकीट मिळाल्याचे कळवले.