मुंबई : माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांचं शनिवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ज्यानंतर रविवारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले ज्यावेळी सर्वसामान्यासह अनेक नेतेमंडळींची यावेळी उपस्थिती पाहायला मिळाली. जेटली यांना आदरांजली वाहण्यासाठी म्हणून आलेल्या या गर्दीचा फायदा घेत त्यावेळी चोरांनी संधी साधत अनेकांचे मोबाईल लंपास केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास दहा ते अकरा जणांचे मोबाईल चोरीला गेल्याची माहिती आहे. ज्यामध्ये भाजप नेते बाबुल सुप्रियो आणि पतंजलीचे प्रवक्ते एस.के. तिजरावाला यांचाही समावेश आहे. 



सुप्रियो यांनी स्वत: ट्विट करत याविषयीची माहिती दिली. तिजरावाला यांनी सर्वप्रथम ट्विट करत मोबाईल चोरीला गेल्याही माहिती दिली. ज्यानंतर सुप्रियो यांनी जवळपास ३५ फोन चोरीला गेल्याची माहिती दिली. अतिशय शिताफीने कोणीतरी हातसफाई करत मोबाईल चोरल्याचं सुप्रियो ट्विटच्या माध्यमातून म्हणाले. 



दिल्लीतील निगमबोध घाट येथे माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यास आले. यावेळीच चोरीच्या घटना घडल्याचं उघड झालं. उत्तर भागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार सदर प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. चोरीला गेलेले फोन ट्रॅकही करण्यात येत आहेत.