`तुमची लादी मजबूत आहे,` चोरांनी चक्क नाल्यातून सोन्याचं दुकान लुटलं; मागे सोडली चिठ्ठी, वाचा नेमकं काय घडलं?
Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) चोरांनी एक सोन्याचं दुकान (jewellery shop) लुटलं आहे. दरम्यान चोरांनी ज्याप्रकारे दुकान लुटलं ते पाहून सोनारासह पोलीसही चक्रावले आहेत. कारण दुकानात एक बोगदा होता जो नाल्यातून आतमध्ये येत होता.
Crime News: उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) एका सोन्याचं दुकान लुटण्यात आलं आहे. मेरठमध्ये चोरांनी नाल्यात 10 फुटांचा बोगदा खोदत दुकान लुटलं असल्याने खळबळ उडाली आहे. चोरांनी लाखोंचं सोनं लंपास केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपास सुरु केला आहे. दरम्यान, इतर व्यापाऱ्यांमध्ये या चोरीनंतर भीतीचं वातावरण असून आंदोलन करत आहेत.
मेरठमधील सोनार सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या दुकानावर आला असता समोरचं चित्र पाहून धक्काच बसला. याचं कारण म्हणजे दुकानात एक बोगदा होता जो थेट नाल्यातून आला होता. तसंच दुकानातील लाखोंचं सोनं गायब झालं होतं. चोरांनी यावेळी एक चिठ्ठी सोडली असून आपण चोरी का करत आहोत याचं कारण सांगितलं आहे. इतकंच नाही तर दुकानातील लादी चांगली आहे असं कौतुकही केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरांनी नाल्यात असणारी भिंत फोडली आणि 10 फुटांचा बोगदा खणला. ही भिंत साध्या विटांपासून तयार करण्यात आलेली असल्याने चोरांनी ती फोडण्यासाठी जास्त कष्ट घ्यावे लागले नाहीत. चोरांनी विटा आणि चिखल दूर करत बोगदा खणला आणि दुकानात प्रवेश करत लाखोंचं सोनं लंपास केलं.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरांनी लाखोंचं सोनं लंपास केलं आहे. दरम्यान नेमकं कितीचं सोनं लुटलं आहे याचा आकडा अद्याप मिळालेला नाही.
चोरीची माहिती मिळताच मेरठ बुलियन ट्रेडर्स असोसिएशनचे (Meerut Bullion Traders Association) सदस्य घटनास्थळी दाखल झाले आणि कायदा-सुव्यवस्थेवरुन आंदोलन करण्यास सुरुवात केली. अशाप्रकारे चोरी होण्याची ही चौथी घटना असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे.
घटनेची माहिती मिळताच दोन पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. पण व्यापाऱ्यांनी पोलिसांना दुकानात प्रवेश करण्यापासून रोखलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडे या चोरीचा तसंच गेल्या काही आठवड्यात झालेल्या चोरींचा तपास सोपवावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. दरम्यान पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, याप्रकरणी तपास सुरु आहे.