Viral News: चोरी करायलाही अक्कल लागते. म्हणजे कोणीही उठलं आणि बिनधास्तपणे चोरी करत सुटलं असं होत नाही. म्हणून तर चोरांची एक मोडस ऑपरेंडी ठरलेली असते. पण जर तुम्ही डोकंच वापरलं नाही आणि चोरी करायची योजना आखली तर फजिती होणार हे नक्की असतं. अशीच फजिती कानपूरमधील तीन तरुणांची झाली आहे. गाडी चोरण्याची योजना आखलेल्या या तरुणांनी महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्षच दिलं नाही. त्यानंतर जे काही झालं ते वाचून एकतर तुमचं हसू थांबणार नाही किंवा डोक्याला हात लावून घ्याल. 


नेमकं काय झालं?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन तरुण लगेच पैसे कमावण्याच्या नादात चोरी करण्याची योजना आखतात. यासाठी ते कानपूरच्या दबौली परिसरातील एक मारुती व्हॅन चोरी करण्याचं ठरवतातं. ठरल्याप्रमाणे अगदी सराईत चोरांप्रमाणे ती ही व्हॅन चोरतात. त्यांच्याबद्दल कोणाला शंकाही येत नाही. पण व्हॅन चोरी केल्यानंतर त्यांच्यासमोर मोठा पेचप्रसंग उभा राहतो. याचं कारण तिघांपैकी एकालाही गाडी चालवायला येत नव्हती.


कोणालाही गाडी चालवायला येत नसल्याचं कळल्यानंतर हे तरुण हार मानत नाहीत. यानंतर ते गाडी ढकलत नेण्याची योजना आखतात. तब्बल 10 किमीपर्यंत हे तरुण गाडी ढकलत घेऊन जातात. पण एका टप्प्यावर अखेर ते दमतात आणि हार मानतात. यानंतर ते वाहन तिथेच सोडून जाण्याचं ठरवतात. यादरम्यान, ते गाडीची नंबर प्लेट काढून घेतात आणि एका अज्ञात ठिकाणी फेकून देतात. नंतर ते तेथून पळ काढतात. 


पोलिसांनी याप्रकरणी तिन्ही चोरांना अटक केली आहे. सत्यम कुमार, अमन गौतम आणि अमित वर्मा अशी या तिघांची नावं आहेत. सत्यम हा महाराजपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये बी.टेकचं शिक्षण घेत आहे. तर अमन डीबीएस कॉलेजमध्ये बी.कॉमच्या शेवटच्या वर्षाला आहे. अमित हा नोकरी करतो. 


सहाय्यक पोलीस आयुक्त भेज नारायण सिंग यांनी तिन्ही आरोपींनी 7  मे रोजी दाबौली येथून वाहन चोरी केलं होतं अशी माहिती दिली आहे. "तिघांनी व्हॅन चोरी केली होती, पण त्यांच्यापैकी एकालाही गाडी चालवायला येत नव्हतं. यामुळे त्यांनी दाबौली ते कल्याणपूर अशा 10 किमीपर्यंत गाडी ढकलत नेली. त्यांनी गाडीची नंबर प्लेट काढून एका निर्जनस्थळी फेकून दिली होती. एकालाही ड्रायव्हिंग येत नव्हतं, पण ती चोरी करुन विकू असा त्यांचा विचार होता," अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिली आहे.


"अमितने चोरीची संपूर्ण योजना आखली होती. चोरीची वाहने सत्यमने तयार केलेल्या वेबसाईटच्या आधारे विकण्याची योजना असल्याचंही त्याने सांगितं होतं. "सत्यम चोरीची वाहने विकण्यासाठी वेबसाइट बनवत होता. त्याची योजना अशी होती की जर वाहने बाजारात विकली गेली नाहीत तर तो वेबसाइटद्वारे विकेल," असं सहाय्यक पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.