माशासोबतच्या फोटोमुळे शशी थरुर अडचणीत
माफी मागा... विरोधकांची मागणी
तिरुवअनंतपूरम : loksabha election 2019 निवडणुकांच्या प्रचारांचं रणशिंग देशभरात फुंकलं गेलं असून आता दारोदार जाऊन सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचण्याचेच सर्वतोपरी प्रयत्न नेतेमंडळी करत आहेत. पक्षश्रेष्ठी म्हणू नका किंवा मग आणखी कोण प्रत्येक जण हा आपल्या पक्षाला जास्तीत जास्त मतं कशी मिळवून देता येतील अशाच प्रयत्नांमध्ये आहे. यामध्ये देशाच्या राजकीय पटलावरील मोठी नावंही मागे राहिलेली नाहीत. काँग्रेस नेते शशी थरुर यांच्या गेल्या काही दिवसांतील सोशल मीडिया पोस्ट पाहता याचा सहज अंदाज लावता येत आहे. पण, प्रचाराचं हे तंत्र आणि उत्साहाच्या भरात त्यांनी केलेलं एक ट्विट सध्या त्यांना अडचणीत आणणारं ठरत आहे.
थरुर यांच्या एका ट्विटमुळे विरोधी पक्षनेत्यांकडून त्यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात येत आहे. त्यांच्या ट्विटमुळे मासेमार वर्गाच्या भावना दुखावल्याची बाब विरोधकांनी उचलून धरली आहे. तिरुवअनंतरपूरम येथील एका मासळी बाजारात गेलं असता थरुर यांनी तेथे मासे विक्री करणाऱ्या काही महिलांसोबतची छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केली. त्यातील एका फोटोमध्ये खुद्द थरुर यांनीही हातात एक मोठा मासा पकडल्याचं पाहायला मिळालं. ज्यानंतर त्यांनी एक ट्विटही केलं ज्यामुळे विरोधकांनी थरुर यांच्यावर निशाणा साधला.
मासेमार वर्गाची भेट घेतल्यानंतर काही फोटो ट्विट करत थरुर यांनी लिहिलं, 'शाकाहारी आणि अतिसंवेदनशील खासदाराला मासळी बाजारात अतिशय उत्साही आणि कुतूहलपूर्ण प्रतिसाद मिळाला. त्यांच्या या ट्विटमधील squeamish म्हणजेच अतिसंवेदनशील या शब्दावर जोर देत विरोधकांनी मासेमार वर्गाच्या भावना दुखावल्याचा मुद्दा उचलून धरला.
आपण वापरलेल्या या शब्दाचा अर्थ थरुर यांनी स्पष्ट केला. किंबहुना मल्याळम भाषेत होणारे काही शब्दांचे अर्थ किती वेगळे असतात याची उदाहरणंही दिली. पण, तरीही त्यांचा होणारा विरोध मात्र मावळलेला नाही. थरुर यांनी वापरलेल्या शब्दांमुळे मासेमारांचा अपमान झाला असल्याचीच बाब विरोधकांनी उचलून धरली. हे एकंदर वातावरण पाहता कोची, कोल्लम आणि कोझिकोडे या भागांमध्ये मासेमारांनी थरुर यांच्याविरोधात निदर्शने केल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे प्रचारांच्या या प्रवासाच थरुर यांना एका फोटोने चांगलंच अडचणीत आणलं असंच म्हणावं लागेल.