मुंबई : काही नेते हे फक्त राजकीय पटलावरच नव्हे, तर त्यांच्या अनोख्या अंदाजामुळे या वर्तुळाबाहेरही प्रकाशझोतात असतात. अशा नेत्यांमध्ये मुळचे केरळचे असणारे काँग्रेस नेते शशी थरुर यांच्याही नावाचा समावेश होतो. शशी थरुर हे त्यांच्या राजकीय कारकिर्दीसोबतच अनेकांचं लक्ष वेधतात ते म्हणजे इंग्रजी भाषेवर असणाऱ्या त्यांच्या प्रभुत्वामुळे. कधी ऐकलेही नसलेले शब्द, संज्ञा त्यांच्या पोस्टमधून पाहायला मिळतात. पण, असे हे थरुर नेमके एका सोप्या शब्दाची स्पेलिंग चुकले आणि बस्स... सोशल मीडियावर त्यांच्यावर निशाणा साधणाऱ्यांची रिघ लागली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


 


गुजरातमधील अहमदाबादच्या Appiitto  नावाच्या एका हॉटेलची शाखा केरळमध्येही सुरू करण्यात आली. पण, केरळमध्ये या हॉटेलला फारशी पसंती मिळत नसल्याचं कारण स्पष्ट करत थरुर यांनी एक ट्विट केलं. विनोदी अंगाने लिहिलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी Appiitto या शब्दाचा मल्याळी भाषेत होणारा अर्थ त्यांनी एखाद्या मल्याळम व्यक्तीला विचारला असता तर त्यांना कळलं असतं, असंही लिहिलं. या ट्विटमध्ये थरुर यांनी अहमदाबादचं स्पेलिंग चुकीचं लिहिलंच. सोबतच गुजरातला उत्तर भारतात येणाऱ्या राज्यांमध्ये गणलं. ज्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांची शाळाच घेण्यास सुरुवात केली. 





Appiitto या शब्दाचा मल्याळम अर्थ हा शौचाशी संबंधित आहे. ज्यामुळे केरळमध्ये त्या हॉटेलकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टीकोन वेगळा आणि काहीसा अनपेक्षित असू शकतो. पण, थरुर यांच्याकडून झालेली ही लहान चूक मात्र त्याहून अधिक मोठी असल्याचच नेटकऱ्यांनी भासवलं आणि त्यांना गुजरात हे राज्य पश्चिम भारताचा भाग असल्याचं स्पष्ट केलं. कोणी, या देशाच शंभरहून अधिक भाषा अस्तित्वात आहेत, आता त्या सर्व शिकायच्या का? असा प्रश्न उपस्थित केला. तर, कोणी ही अशी चूक थरुर कसे करु शकतात? असं विचारत त्यांच्यावर उपरोधिक शब्दांत टीका केली. ट्विटरवर सुरू असणारी ही टीवटीव पाहता नेहमी नेटकऱ्यांची शाळा घेणारे थरुर यावेळी मात्र स्वत:च शिक्षेस पात्र ठरले, असंच म्हणावं लागेल.