चंदीगड : पंजाब विधानसभा निवडणुकीसंदर्भात एक मोठी बातमी आहे. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी दोन जागांवर निवडणूक लढविण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या मुख्यमंत्री चन्नी हे चमकौर साहिब विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंजाबचे वरिष्ठ काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी काँग्रेस पक्ष सोडून स्वतःचा 'पंजाब लोक कांग्रेस' पक्ष स्थापन केला आहे. त्यांनी या निवडणुकीत काँग्रेसला पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर, काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत सत्ता आपल्याच ताब्यात ठेवण्याचा निर्धार केला आहे.


या निवडणुकीसाठी उमेदवाराची पहिली यादी दिल्लीला पाठविण्यात आली आहे. या पहिल्या यादीतून कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे समर्थक असलेल्या ९ आमदाराना वगळण्यात आले आहे. तर, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी हे दोन जागांवर निवडणूक लढविणार आहेत.


चरणजीत सिंह चन्नी हे त्यांचा पूर्वीचा मतदारसंघ चमकौर साहिब येथून आणि आदमपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात अशी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार काँग्रेस उद्या (बुधवारी) उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणार आहे. 


दरम्यान, पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्रकार परिषद घेत, पंजाबमध्ये यापुढे माफिया मॉडेल नाही तर काँग्रेस मॉडेल चालेल, असे स्पष्ट करतानाच आतापर्यंत माफिया राजवट सुरू होती. या माफियांनी सरकारची धोरणेही राबवू दिली नाहीत अशी टीका कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे नाव न घेता केली आहे.