नवी दिल्ली : सरकार अर्थसंकल्पाच्या तयारीला लागलं आहे. १ फेब्रुवारीला बजेट सादर होणार आहे. अर्थमंत्र्यांसकट सर्व अर्थखातं त्याच्या तयारीला लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. अर्थमंत्र्यांसकट सर्व अर्थखात्याने जय्यत तयारी सुरू केली आहे. या अर्थसंकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे जी एस टी नंतर सादर होणारा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. त्याचबरोबर मोदी सरकारचं हे शेवटचं बजेट असेल. २०१९ मध्ये लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे त्यावर्षीचा अर्थसंकल्प हा अंतरीम अर्थसंकल्प असेल. 


२०१८ चा अर्थसंकल्प हा अर्थमंत्री अरुण जेटलींचा पाचवा अर्थसंकल्प असेल. त्याचबरोबर  सर्वसाधारण अर्थसंकल्पाबरोबर रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला जाण्याची ही दुसरी वेळ असेल. पण आपल्याला हे माहित आहे का की अर्थसंकल्प कसा तयार केला जातो. त्याची प्रक्रिया काय असते. 


या गोष्टींमधून गेल्यावर मिळतं अर्थसंकल्पाला अंतिम रुप.


उत्पन्न आणि खर्चाची पडताळणी


अर्थसंकल्पाची तयारी अर्थखातं बऱ्याच आधीपासून सुरू करतं. तयारी सुरू करण्यआधी अर्थखातं वेगवेगळ्या विभागांकडून त्यांचं उत्पन्न आणि खर्च यांचा आढावा घेतं. या उत्पन्न आणि खर्चाच्या आकडेवारीनुसारच बजेट तयार केलं जातं.


राज्यांच्या अर्थमंत्र्यांशी संवाद


अर्थसंकल्पातला दुसरा टप्पा असतो वेगवेगळ्या महत्वाच्या घटकांशी संवाद साधण्याचा. यात उद्योग, अर्थतज्ञ, ट्रेड युनियन, कृषीशी संबंधीत लोक आणि राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समावेश असतो. केंद्रीय अर्थमंत्री हा संवाद अर्थसंकल्पाच्या तयारीच्या आधीच म्हणजे नोव्हेंबर महीन्यातच  सुरू करतात. तो पुढे जानेवारीपर्यत सुरू राहतो. या सर्व घडामोडींवर पंतप्रधानांच्या कार्यालयाची देखरेख असते.


कागदपत्रांची छपाई


यानंतर अर्थसंकल्पाशी संबंधीत सर्व महत्वाच्या कागदपत्रांची छपाई गुप्तपणे नॉर्थ ब्लॉकच्या (अर्थखात्याचं कार्यालय) तळघरातल्या सरकारी प्रिंटीग प्रेसमध्ये होते. यामुळेच डिसेंबर महिन्यापासूनच अर्थखात्याने प्रसारमाध्यमांचा नॉर्थ ब्लॉकमधला प्रवेश बंद केला होता. यामागे अर्थसंकल्पाशी संबंधीत कागदपत्रांची गुप्तता राखणे हे कारण होतं. 


कोणाशीच संपर्क नाही, कुटुंबियाशीसु्द्धा नाही


अर्थसंकल्प तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांचा संपर्क एक आठवडाआधीपासूनच तोडला जातो. ते कोणाशीही संपर्क साधू शकत नाहीत. यामागे अर्थसंकल्पाची गुप्तता राखणे हा हेतू असतो. जे अधिकारी या कामाशी संबंधीत असतात त्यांना एका तळघरात बंदिस्त केलं जातं. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच त्यांना बाहेर येता येतं. तोपर्यत बजेटशी आणि अर्थमंत्रालयाशी संबंधीत अधिकाऱ्यांचा जगाशी असलेला संपर्क तोडला जातो. ते कोणाशीही बोलू शकत नाही. इतकंच काय त्यांना आपल्या कुटुंबियाशीसु्द्धा बोलता येत नाही. अर्थसंकल्प सादर केल्यानंतरच ते आपल्या कुटुंबियाशी संपर्क साधू शकतात. त्याशिवाय त्यांच्या प्रत्येक हालचालीवर आणि संभाषणावर गुप्तचर अधिकाऱ्यांची देखरेख असते.


अर्थसंकल्पीय भाषण


अर्थसंकल्पाच्या दोन दिवस आधी माहिती संपर्क अधिकारी अर्थसंकल्पाचं भाषण तयार करतात. यासाठी त्यांची एक टिम बनवली जाते. या टिममध्ये जनसंपर्क खातं आणि माहिती प्रसारण विभागाच्या २० अधिकाऱ्यांचा समावेश केला जातो. हे अधिकारी इंग्रजी, हिंदी आणि उर्दू मध्ये मसुदा तयार करतात. जोपर्यत संसदेत अर्थमंत्र्यांचं भाषण संपत नाही तोपर्यत या अधिकाऱ्यांना बाहेर जाता येत नाही. इतकंच काय कॅबिनेटलासुद्धा संसदेत अर्थसंकल्प सादर व्हायच्या फक्त १० मिनिटं आधीच अर्थसंकल्पाची प्रत दिली जाते.


अर्थसंकल्पाचा इतिहास


भारताचा अर्थसंकल्प १५० वर्ष जुना आहे. पहिला अर्थसंकल्प इंग्रज सरकारचे अर्थमंत्री जेम्स विल्सन यांनी सादर केला होता. तर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प देशाचे पहिले अर्थमंत्री आरके षणमुखम शेट्टी यांनी सादर केला होता. स्वातंत्र्यापासून आतापर्यत अर्थसंकल्पाच्या सादरीकरणात बरेच बदल झाले आहेत. आता अर्थसंकल्पाबाबत फारच गुप्तता राखली जाते.