बडवानी (म. प्रदेश) - मध्य प्रदेशमधील बडवानी जिल्ह्यातील बंधनपुरा या छोट्याशा गावात राहणारा टिल्लू नावाचा युवक सध्या राज्यात चर्चेचा विषय झाला आहे. याचे कारणही एकदम हटके आणि कोणालाही आश्चर्य वाटावे असेच आहे. टिल्लू या युवकाने असा दावा केला आहे की त्याला कानाने नाही तर नाकाने ऐकायला येते. त्यामुळे तो मोबाईलही नाकाजवळ धरून पलीकडच्या व्यक्तीशी बोलतो. आता यात कितपत सत्यता आहे, हे टिल्लूला आणि त्याच्या कुटुंबियांनाच माहिती. पण ही बातमी संपूर्ण जिल्ह्यात एकदम हवेसारखी पसरली आणि टिल्लूला पाहण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून आणि राज्यातून लोक बंधनपुरामध्ये येऊ लागले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टिल्लू हा लहानपणापासूनच बधिर असून, त्याला ऐकायला येत नव्हते, असे त्याच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे. पण काही दिवसांपूर्वी अचानक टिल्लूला कानाऐवजी नाकातून ऐकायला यायला लागले. त्यानेही सगळ्यांना याच पद्धतीने आपल्याला ऐकायला येत असल्याचे सांगितले. आपल्याला कानाऐवजी नाकाने ऐकायला येते, हे जेव्हा टिल्लूला समजले, त्यावेळी सुरुवातीला त्याला खूप त्रास झाला. पण नंतर त्याने शरीराला त्याची सवय लावली. मग हळूहळू तो नाकानेच समोरच्याचे म्हणणे ऐकण्याचा प्रयत्न करू लागला. नाकाजवळ मोबाईल धरला, तर आपल्याला समोरच्या व्यक्तीचे एकदम व्यवस्थित ऐकायला येते, असे टिल्लूचे म्हणणे आहे. पण हा वेगळाच प्रकार आधी गावात आणि नंतर संपूर्ण जिल्ह्यात वेगाने पसरला. लोक त्याला बघण्यासाठी बंधनपुरा गावात येऊ लागले.


नाकाने ऐकायला येणारी व्यक्ती आम्ही आयुष्यात पहिल्यांदाच बघितली असल्याचे येणारे नागरिक सांगतात. पण टिल्लूचा हा दावा नाक, कान, घसा तज्ज्ञ डॉ. अनिता सिंगारे यांनी फेटाळून लावला. कोणत्याही व्यक्तीला नाकाने ऐकायला येऊच शकत नाही. नाक आणि कान या दोन्ही अवयवांचे काम वेगवेगळे आहे. त्यामुळे नाकाने कोणाला कधीच ऐकायला येऊ शकणार नाही. टिल्लूच्या शरीराचे परीक्षण करायला हवे. पण नाकाने ऐकायला येणे संभव नाही, असे डॉक्टरांनी स्पष्ट केले.