Permanently Work From Home: कोरोनाच्या लाटेनंतर आता अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयामधून काम करणं बंधनकारक केलं आहे. अनेक ठिकाणी आता कंपन्यांनी हायब्रीड म्हणजेच काही दिवस घरुन आणि काही दिवस कार्यालयातून काम करण्याची मूभाही काढून घेत सरसकट कोरोनाच्या पूर्वीच्या काळात चालायचं त्याप्रमाणे कार्यालयातूनच काम करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. त्यामुळे मागील अडीच ते तीन वर्षांपासून घरुन काम करण्याची सवय सोडून आता कर्मचाऱ्यांना पुन्हा नियमितपणे कामावर जावं लागत आहे. मात्र सध्या एका कंपनीने प्रवाहविरुद्ध जात सरसकट वर्क फ्रॉम होम धोरण स्वीकारलं आहे.


30 हजार कर्मचारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील ग्लोबंट एसए कंपनीने कोरोनाच्या फटक्यानंतर कामासंदर्भात कर्मचारीकेंद्रीत धोरण स्वीकारल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टीने मिगोया यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ग्लोबंटने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी पर्मनंट रिमोट वर्क धोरण स्वीकारलं आहे. म्हणजेच सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कायमचं वर्क फ्रॉम होम करता येणार आहे. विशेष म्हणजे 33 देशांमधील आपल्या 30 हजार कर्मचाऱ्यांसाठी ग्लोबंटने हे धोरण सरसकट स्वीकारलं आहे. मिगोया यांना प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना भेटण्यात रस नाही असंही नाही. उलट ग्लोबंटने कर्मचारी पुन्हा कामावर रुजू होतील असा विचार करुन कोरोनानंतर परिस्थिती सामान्य होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मागील काही काळापासून आपल्या कार्यालयांची संख्या वाढवली. मात्र असं असलं तरी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या इच्छेविरुद्ध कार्यालयामध्ये कामासाठी यावं अशी कंपनीची इच्छा नाही. 


स्वत:चा वेळ घ्या आणि परत या


मिगोया यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची साथ ओसरल्यानंतरपासून कार्यालयीन जागा वाढवण्याचं कंपनीचं धोरण स्वीकारलं आहे. कर्मचारी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर त्यांना समावून घेण्याच्या दृष्टीने कंपनीने ही तयारी केली. मात्र आता मिगोया यांनी, 'प्रत्येकाच्या डोक्यावर बंदूक ठेवल्याप्रमाणे त्याने ऑफिसमधूनच काम करावं अशी कंपनीची इच्छा नाही' असं स्पष्टपणे सांगितलं आहे. "प्रत्येकला त्याचा वेळ घेऊन परत येऊ द्या, असं आधी कंपनीचं धोरण होतं. कंपनीने अधिक फ्लेक्जीबल राहत कर्मचाऱ्यांच्या कलाकलाने कार्यालयातून काम सुरु करण्याचं ठरवलं. मात्र कर्मचारी ऑफिसला यायचे. एकत्र जमायचे आणि वेगळ्याचं कारणांसाठी ते कार्यालये वापरायचे. मात्र आम्ही आमची कार्यालये नवीन गरजांनुसार तयार करत होतो," असं मिगोया म्हणाले. 


नक्की वाचा >> तुम्हालाही होतोय का Shift Shock चा त्रास? 70% हून अधिक कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना ग्रासलं


मुख्य ऑफिस कुठे?


मिगोया यांनी कोरोनानंतर कर्मचारी ऑफिसला येतील आणि त्यांना अधिक मुक्तपणे वावरता यावं यासाठी अतिरिक्त बसण्याची जागा, फोन बूथ, नवीन वर्क स्टेशन्स, खासगी मिटींगसाठी छोटे हॉल, मोठ्या आकाराचे टेबल, नव्या गरजांनुसार फर्निचर अशा बऱ्याच गोष्टी करुन घेतल्या. एनबीएमधील लॉस एन्जलीस क्लिपर्ससारखे कंपनीचे मोठे क्लायंट आहे. 1 बिलियन अमेरिकी डॉलर्सची गुंतवणूक करुन भविष्यातील 5 वर्षांमध्ये 20 हजार कर्मचाऱ्यांना ऑफिसमधून काम करता यावं असं कंपनीचं नियोजन आहे. कंपनीचं मुख्य कार्यालय अर्जेंटीनाची राजधानी असलेल्या ब्युनोस आयर्समध्ये असलं तरी आता जगभरामध्ये ही कंपनी ऑफिस सुरु करत आहे. उराग्वेमध्येही कंपनीने ऑफिस सुरु केलं आहे. 


पुण्यातही कंपनीचं ऑफिस


कंपनीने कार्यालये तयारी ठेवली असली तरी कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने यावं अशी कंपनीची अपेक्षा आहे. मिगोया यांनी, "आम्ही कामाच्या लोकेशनसंदर्भात फार फ्लेक्झीबल आहोत. आम्ही यापुढेही असेच धोरण ठेवणार आहे. कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांनी कामाबद्दल, कार्यालयांमधून काम करण्यासंदर्भात आकर्षण वाटतं म्हणून स्वेच्छेने आलं पाहिजे. केवळ डेस्कवर काम करायचं म्हणून कर्मचाऱ्यांनी ऑफिसला येता कामा नये. कार्यालये ही कंपनीसाठी कनेक्शन इंजिनसारखी काम करतात," असं म्हटलं. ग्लोबंटचं भारतातील एक ऑफिस पुण्यातील हिंजवडीमध्ये आहे तर दुसरं बंगळुरुमध्ये आहे.