मोदींच्या `त्या` ट्विटचा सस्पेन्स संपला; ८ मार्चला सोशल मीडिया महिलेकडे सोपवणार
#SheInspiresUs
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पुन्हा एकदा नवं ट्वीट करून सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. यंदाच्या महिला दिनी आपली सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स चालवण्याची संधी एका महिलेकडे सोपवण्यात येणार आहे, असं पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केलं आहे. येत्या रविवारी सोशल मीडिया सोडण्याचा विचार मोदींनी सोमवारी ट्विटरवरून व्यक्त केला होता. त्यामुळे संपूर्ण देशातल्या नेटिझन्समध्ये हलकल्लोळ उडाला होता. मात्र यंदाच्या महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी आखलेला हा नवा उपक्रम असल्याचं आता स्पष्ट झालं आहे.
ज्या महिलेचे कार्य आणि जीवन प्रेरणादायी असेल, अशा महिलेला एका दिवसासाठी माझी सोशल मीडिया अकाऊंट्स चालवण्याची संधी मिळणार आहे, असं मोदींनी नव्या ट्वीटमध्ये स्पष्ट केलंय. तुम्ही ती महिला असाल किंवा अशा प्रेरणादायी महिलेला तुम्ही ओळखत असाल तर #SheInspiresUs असा हॅशटॅग वापरून तिची माहिती मला पाठवा, असं आवाहन मोदींनी या ट्वीटमधून केलं आहे.
नरेंद्र मोदींच्या ट्विटनंतर #SheInspiresUs हा हॅशटॅग ट्विटरवर पहिल्या क्रमांकावर ट्रेंड होत आहे. सोमवारी पंतप्रधानांनी गोंधळात टाकणारं ट्विट करत, सोशल मीडिया सोडण्याविषयीचा विचार करत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर मोदी सोशल मीडियाला रामराम ठोकणार का? याबाबत मोठी चर्चा होती. अखेर मंगळवारी मोदींनी पुन्हा एकदा ट्विट करत, सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.