एअर स्ट्राईकचे पुरावे मागणारे शहीदांचे नातेवाईकही देशद्रोहीच- विजय रुपानी
यंदाची निवडणूक ही भारत आणि पाकिस्तानमधील लढाई आहे.
गांधीनगर: भारतीय वायूदलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागणारा प्रत्येकजण देशद्रोही आणि पाकिस्तान समर्थक आहे. मग पुलवामा हल्ल्यातील शहीदांचे नातेवाईकही याला अपवाद नाहीत, असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी म्हटले. ते मंगळवारी अहमदाबादमधील भाजप मुख्यालयात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की यंदाची निवडणूक ही भारत आणि पाकिस्तानमधील लढाई आहे. कारण पाकिस्तान आणि काँग्रेस हे दोघेही भारतीय वायूदलाने केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागत आहेत. या दोघांची भाषा एकाचप्रकारची आहे. त्यामुळे जो कोणी भारतीय लष्कराच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करेल तो एकप्रकारे देशाची प्रतिमा मलिन करण्यात पाकिस्तानची मदत करत आहे, असे रुपानी यांनी सांगितले.
यावर पुलवामा हल्ल्यातील काही शहीदांचे काही नातेवाईकही एअर स्ट्राईकचे पुरावे मागत असल्याकडे रुपानी यांचे लक्ष वेधण्यात आले. तेव्हा रूपानी यांनी पुरावे मागणारी व्यक्ती कोणीही असो तो नक्कीच पाकिस्तान समर्थक ठरतो, असे सांगितले.
अखेर पाकिस्तान तोंडघशी पडलाच; IAF ने दिले F-16 पाडल्याचे ठोस पुरावे
विजय रुपानी यांनी भाजपाच्या संकल्पपत्राविषयी म्हटले की, हे संकल्पपत्र नवा भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञा आहे. भारताने गेल्या पाच वर्षात खूप प्रगती केल्याचे जगाने मान्य केलं आहे. गेल्या ६० महिन्यांत मोदी सरकारने थेट भ्रष्टाचाराशी लढा दिला. देशाची सुरक्षा आमच्या सरकारची पहिली प्राथमिकता आहे. दहशतवाद्यांशी लढा देण्यासाठी सरकारने सैन्याला सूट दिली आहे. कारण दहशतवादाशी लढा देताना कोणतीही तडजोड सरकारला मान्य नाही, असे रुपानी यांनी स्पष्ट केले.