Nitin Gadkari Death Threat Calls: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या कार्यालयात पुन्हा धमकीचा फोन (Threatening Phone Call) आला आहे. फोन करणाऱ्याने मला केंद्रीय मंत्र्याशी बोलायचे आहे असं सांगत धमकी दिली. नितीन गडकरी यांच्या कार्यालयातून दिल्ली पोलिसांना (Delhi Police) याबाबत माहिती देण्यात आली आहे. पोलीस याप्रकरणी सर्व बाजूंनी तपास करत आहेत. याआधी दोनदान नितीन गडकरी यांच्या कार्यालयात धमकी फोन आला होता. त्याप्रकरणी एएनआयचा तपास सुरु आहे. आता पुन्हा म्हणजे तिसऱ्यांदा धमकीचा फोन करण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काल संध्याकाळी नितीन गडकरी यांच्या कार्यालयात एक फोन आला. त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी फोन उचलला. त्यावेळी समोरुन बोलणाऱ्या व्यक्तीने आपल्याला केंद्रीय मंत्र्यांशी बोलायचं असल्याचं सांगितलं. यावर कर्मचाऱ्यांनी गडकरी कामात व्यस्त असल्याने ते फोनवर बोलू शकत नसल्याचं सांगतिलं. यावर त्या व्यक्तीने धमकी दिली. हा व्यक्ती कोण आहे, तो कुठल्या ठिकाणाहून बोलत होता, त्याचा उद्देश काय होता  याचा तपास आता पोलीस करत आहेत. 


याआधीही धमकीचे फोन
याआधी 14 जानेवारीला नितीन गडकरी यांना धमकी देण्यात आली होती. गडकरी यांच्या कार्यालयात सकाळी 11:29 वाजता, 11:35 वाजता आणि 12:32 वाजता असे तीन वेळेला हे धमकीचे कॉल आले. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासात धमकीचा कॉल बेळगावतून आला असल्याची माहिती मिळाली. बेळगाव जेलमध्ये असलेल्या जयेश पुजारी या आरोपीने फोन केल्याचं समोर आलं. 


त्यानंतर 21 मार्चला नितीन गडकरी यांना धमकीचा दुसरा फोन आला होता. नागपूरमधील जनसंपर्क कार्यालयात (Nagpur News) सकाळी धमकीचे तीन फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. धमकी देणाऱ्याने दहा कोटी रुपयांची मागणी केली. तसंच याची वाच्यता पोलिसांकडे करू नये असा इशाराही दिला. सोबतच त्याने संपर्कासाठी एक मोबाईल क्रमांकही दिला. 


राजकीय नेत्यांना धमकीच्या फोन
गेल्या काही महिन्यात राजकीय नेत्यांना धमकी देण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना जीवे मारण्याची धमकीची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार यांना जीवे मारण्याच्या धमकीचा फोन आला होता. आमदार आदित्य ठाकरेंच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. तर काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी देखील आपल्यावर पाळत ठेवली जात असून, आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांत दिली होती. काँग्रेसचे दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या पत्नीवर हल्ला करण्यात आल्याची ही घटना घडली होती.