दिलासादायक : तीन दिवसांच्या चिमुरडीची कोरोनावर मात
सध्या हे बाळ २२ दिवसांचं असून सुखरूप आहे.
नवी दिल्ली : राजस्थानच्या नागौर जिल्ह्यातील फक्त तीन दिवसांच्या चिमुरडीला कोरोनाची लागण झाली होती. पण या चिमुरडीनं या धोकादायक विषाणूवर मात केली आहे. योग्य उपचारानंतर मुलीला रुग्णालयातून सुट्टी देखील देण्यात आली आहे. बहुधा देशात या प्रकारची पहिलीच घटना होती जिथं तीन दिवसांच्या बाळाला कोरोना विषाणूची लागण झाली. सध्या हे बाळ २२ दिवसांचं असून सुखरूप आहे.
नागौरचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी शीशराम चौधरी यांनी सांगितले, जिल्ह्यातील बासणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये दाखल झालेल्या एका महिलेने १६ एप्रिल रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यावेळी बाळाचे आई-वडील आणि संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली होती. म्हणून क्षणाचाही विलंब न करता बाळाची देखील कोरोना चाचणी करण्यात आली.
चाचणीनंतर १९ एप्रिल रोजी बाळाचे रिपोर्ट देखील कोरोना पॉझिटिव्ह आले. त्यानंतर आई आणि मुलीला नागौरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले. सांगण्यात येत आहे की उपचारादरम्यान दोन वेळा बाळाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले होते. परंतु आईच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे दोघींना वेगळं ठेवण्यात आलं होतं. तर आता आईही कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडली आहे.
शुक्रवारी आई आणि मुलीला रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला. बासणी हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट होता. याठिकाणी तब्बल १०६ कोरोना रुग्ण आढळले होते. यातील २० जणांना बरे झाल्यानंतर शुक्रवारी सुट्टी देण्यात आली. आता या गावातून केवळ १५ संक्रमित रुग्ण शिल्लक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.