अघोरी! न्युमोनिया झालेल्या तीन महिन्याच्या बाळाला 51 वेळा गरम रॉडने चटके, पुरलेला मृतदेह बाहेर काढणार
न्यूमोनियावर उपचार करण्याच्या नावाखाली तीन महिन्याच्या चिमुरडीला गरम रॉडने 51 वेळा चटके देण्यात आल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मुलीने उपचारादरम्यान रुग्णालयात जीव सोडला.
न्यूमोनिया झालेल्या तीन महिन्याच्या बाळाला उपचाराच्या नावाखाली ढोंगी वैद्याने 51 वेळा गरम रॉडचे चटके दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशात ही संतापजनक घटना घडली आहे. यानंतर चिमुरडीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. श्वसनाचा त्रास असलेल्या या चिमुरडीचा 15 दिवसांनी मृत्यू झाला. आदिवासींचं वर्चस्व असणाऱ्या शाहदोल जिल्ह्यात ही घटना घडली आहे.
मृत्यूनंतर मुलीचा मृतदेह पुरण्यात आला होता. दरम्यान अधिकाऱ्यांनी हा मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदन करणार असल्याचं सांगितलं आहे.
युथ काँग्रसेचे अध्यक्ष आणि डॉक्टर असणारे विक्रांत भुरिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, गरम चटके दिल्याने मृत्यू होऊ शकतो. वेदना कमी करण्याचा हा एक मार्ग आहे, परंतु समस्या अशी आहे की यामुळे संसर्ग फैलावतो, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो".
"अशा प्रथा अजूनही प्रचलित आहेत आणि मी त्या भागातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना तक्रार नोंदवून कठोर कारवाई करण्याची विनंती करतो," असे भाजपचे प्रवक्ते डॉ. हितेश वाजपेयी यांनी सांगितलं आहे.