नवी दिल्ली : रेल्वे प्रशासनाने  ‘रामायण एक्स्प्रेस’ या नावाने नवी रेल्वे सुरु केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी ही रेल्वे दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकावरुन रवाना होईल. रेल्वेमंत्री पियूष गोयल या रेल्वेला ग्रीन सिग्नल दाखवतील. या रेल्वेतून एकावेळी ८०० प्रवासी प्रवास करु शकतात. रामाशी निगडित असणाऱ्या धार्मिक स्थळांना भेटी देणे सोपे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासन नवी रेल्वे सेवा सुरु केलेय. दरम्यान, तिकीट आरक्षित करायचे असल्यास आयआरसीटीसीच्या (irctc)साईटवरुन करु शकता. याशिवाय देशात असलेल्या आयआरसीटीसीच्या २७ सुविधा केंद्रांमध्येही हे आरक्षण करता येईल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि श्रीलंकेमधील रामाशी जोडलेल्या सर्व स्थळांना भेट देण्यासाठी या खास रेल्वेचा उपयोग होणार आहे. रेल्वेने भाविकांसाठी १६ दिवसांचे पॅकेज दिले आहे. यात भारत आणि श्रीलंकेतील सर्व महत्त्वपूर्ण स्थळांना भेट देता येईल. सुरुवातीला आयोध्या, हनुमान गढी, रामकोट आणि कनक भवन मंदिर या ठिकाणी रेल्वे जाईल. त्यानंतर रेल्वे नंदिग्राम, सीतामढी, जनकपूर, वाराणसी, प्रयाग श्रृंगवेरपूर, चित्रकूट, नाशिक, हम्पी आणि रामेश्वर याठिकाणी जाईल. त्यानंतर ज्यांना श्रीलंकेतील रामाची स्थळे पाहायची आहेत त्यांना विमानाने त्याठिकाणी नेण्यात येईल.


केवळ भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १५,१२० रुपये मोजावे लागतील. तर श्रीलंकेला जाण्यासाठी चेन्नईतून कोलंबोला जावे लागणार आहे. या प्रवाशांना ३६,९७० रुपये जादाचे भरावे लागतील. याआधी यासाठी ४७ हजार रुपये आकारण्यात येणार होते. मात्र, यात कपात करण्यात आलेय. श्रीलंकेत सहा दिवसांमध्ये प्रवास खर्चाचा समावेश आहे.


श्रीलंकेत ५ रात्री आणि ६ दिवस राहता येणार आहे. याठिकाणी कँडी, नुवारा एलिया, कोलंबो, नेगोंबो येथे रामायण काळातील संबंधित स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. या संपूर्ण पॅकेजमध्ये जेवणाची आणि राहण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्याचबरोबर २८ ऑगस्टपासून त्रिवेंद्रम येथून एसी रेल्वे सुरु केली जाणार आहे. ही गाडी ९ सप्टेंबर पर्यंत चालवली जाणार आहे. यात ३९ हजार ८०० असे पॅकेज असेल. त्रिवेंद्रमहून पंचवटी, चित्रकूट, तुलसी मानस मंदिर, दरभंगा, सीतामढी अयोध्या आणि रामेश्वरचे दर्शन करता येणार आहे.