Train and Flight Ticket Cancellation Rules: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा म्हटलं की, अनेकांचच प्राधान्य रेल्वे किंवा मग विमान प्रवासाला असतं. किमान वेळेत कमाल अंतर गाठण्यासाठी प्रवासाची ही माध्यमं मोठी मदत करतात. पण, एखाद्या वेळी काही कारणास्तव प्रवास करणं शक्य होत नाही आणि त्यामुळं आखलेला बेत अनेकदा रद्द करावा लागतो. परिणामी रेल्वे आणि विमान तिकीटांची तिकीटंही आयत्या वेळी रद्द करावी लागतात. अशा वेळी आपले सगळे पैसे, हजारोंची रक्कम वाया जाते? की रिफंड स्वरुपात ती परत मिळते? नियम काय सांगतो तुम्हाला माहितीये? 


विमान तिकीट रद्द केल्यास... 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एविएशन (DGCA) च्या माहितीनुसार कंपनीकडून विमान रद्द झाल्यास कंपनी रिफंड किंवा त्याच मार्गावरील दुसऱ्या विमानाची व्यवस्था करून देते. इथं रिफंड म्हणून पूर्ण रक्कम मिळणं अपेक्षित असतं. पण, जेव्हा तुमच्याकडून तिकीट रद्द केली जाते तेव्हा हे नियम बदलतात. 


विमानाच्या उड्डाणापूर्वी 3 दिवसाच्या आत तिकीट रद्द केल्यास 3500 रुपयांचा दंड वगळता इतर रक्कम तुम्हाला मिळते. 3 दिवासंच्या आधी तिकीट रद्द केल्यास ही रक्कम 3000 रुपये होते आणि 7 दिवस किंवा त्याहून आधी तिकीट रद्द केल्यास पूर्ण रक्कम किंवा कंपनीच्या नियमांनुसार रिफंड मिळतं. 


रेल्वे तिकीटाचे नियम 


रेल्वे चार्ट तयार होण्यापूर्वी 48 तासांच्या आधी तिकीट रद्द केल्यास फर्स्ट/एक्जीक्यूटिव क्लाससाठी 240 रुपये, एसी 2 टियर/फर्स्ट क्लाससाठी 200 रुपये, एसी 3 टियर/एसी चेयर कार/एसी 3 इकोनॉमीसाठी 180 रुपये, स्लीपर क्लाससाठी 120 रुपये आणि सेकंड क्लाससाठी 80 रुपयांचा कॅन्सलेशन चार्ज लागतो. रेल्वे निघण्याच्या 12 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास तुम्हाला त्यासाठी तिकीटाच्या 25 टक्के रक्कम दंड स्वरुपात भरावी लागते. 12 तासांहून कमी आणि रेल्वे निघण्याच्या 4 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास रकमेच्या 50 टक्के पैसे दंड स्वरुपात आकारले जातात. 


हेसुद्धा वाचा : बाईकमध्ये कायमच असतो किल स्विच! कारण माहितीये?


 


IRCTC च्या नियमांनुसार तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं बुक केलेली तिकीटंही रद्द करता येतात. यामध्ये कॅन्सलेशन रक्कम कापून उरलेले पैसे थेट तुमच्या खात्यात जमा केले जातील. पीआरएस अकाऊंटवर जाऊन तिथं तिकीट रद्द केल्यास तिथल्या तिथेच ही रक्कम तुम्हाला मिळेल. काही कारणास्तव तुमची निर्धारित रेल्वेच रद्द झाल्यास तिकीटाची पूर्ण रक्कम थेट तुमच्या खात्यावर जमा होईल. किंबहुना रेल्वे प्रवासाचा मार्ग बदलला आणि त्या मार्गावर तुम्हाला प्रवास करायचा नल्यासही तिकीटाची पूर्ण रक्कम तुम्हाला मिळणं अपेक्षित असतं. 


तुम्हाला माहितीये का, अपेक्षित स्थानकावर रेल्वे निर्धारित वेळेपेक्षा तीन तास उशिरानं पोहोचली तरीही तुम्ही तिकीटाच्या रिफंडसाठी पात्र ठरता. पण, ही संपूर्ण रक्कम मिळवण्यासाठी ट्रेन निघण्यापूर्वी टीडीआर ऑनलाइन भरणं विसरु नका. तुम्ही AC कोचमध्ये प्रवास करताय आणि तिथं एसीची सुविधा व्यवस्थित सुरुच नाहीये, तर तुम्ही तिकीटाच्या रकमेतील काही रक्कम रिफंड स्वरुपात परत मिळवू शकता हे कायम लक्षात ठेवा.