नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. यानंतर प्रथेप्रमाणे विविध संस्थांकडून मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निकाल जाहीर करण्यात आले. यापैकी जवळपास सर्वच एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) सरकार पुन्हा एकदा सत्तेत येण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वी विरोधकांकडून एनडीएला यंदा बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, असा दावा केला जात होता. मात्र, एक्झिट पोलचे अंदाज समोर आल्यानंतर हे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. त्यामुळे विरोधकांकडून याविषयी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट करून म्हटले आहे की  , टीव्ही बंद करायची आणि सोशल मीडियावरून लॉग आऊट वेळ आली आहे. कारण सर्वच एक्झिट पोल चुकीचे असणे शक्य नाही. आता केवळ २३ तारखेची वाट पाहायची, त्यादिवशी पृथ्वी अजूनही आपल्या अक्षावरच फिरत आहे, हे सिद्ध होईल, असे अब्दुल्ला यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 



तत्पूर्वी काँग्रेस नेते शशी थरूर यांनीही एक्झिट पोलचे अंदाज चुकीचे असल्याचे मत व्यक्त केले. माझ्या मते एक्झिट पोल हे चुकीचे आहेत. मागील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये ५६ एक्झिट पोल चुकीचे ठरले होते. भारताचं म्हणाल तर, येथील जनता मोठ्या प्रमाणावर सत्य सांगण्यापासून दूर राहते. आपण निवडणुकांच्या अंतिम आणि तितक्याच खऱ्या निकालांची वाट पाहू, असे थरूर यांनी म्हटले.


लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात ६२ टक्के इतके मतदान झाले. येत्या २३ तारखेला मतमोजणी होईल.