मुंबई : पावसाळा सुरु होण्यापूर्वी साधारण काही दिवस तरी आपण या ऋतुच्या तयारीसाठी वेळ देतो. अगदी शालेय विद्यार्थ्यांची वह्यापुस्तकांना कव्हर घालण्याची तयारी असो, किंवा मग नवी छत्री, रेनकोट खरेदी करण्यासाठी तुमचीआमची लगबग असो. ही तयारी कोणालाही चुकलेली नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पावसाळा सुरु झाल्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपण न चुकता करतो ती म्हणजे घरात लावण्यात आलेल्या रोपट्यांची नित्यनियमानं काळजी घेतो. (Tips to take care of plants during monsoon rain)


घरात तुळशीसोबतच इतरही काही रोपं, फुलझाडं लावण्याकडे अनेकांचाच कल असतो. बहुधा गेल्या काही वर्षांमध्ये यामध्ये प्रचंड वाढही झाली आहे. पण, या आवडीवर विरजण टाकतो तो म्हणजे पाऊस. 


पावसात घरातल्या रोपट्यांची विशेष काळजी घेतली जाणं गरजेचं असतं. त्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे लक्षात घेणं गरजेचं असतं. चला तर मग, पाहुयात रोपट्यांची काळजी घेण्याची सोपी पद्धत. 


- कुंडी रिकामी ठेवू नका 
पावसाळ्यात एखादं रोप लावताना कुंडीमध्ये मातीचे दोन भाग आणि शेणखताचा एक भाग भरावा. असं केल्यास कुंडीत पाणी साचत नाही. असं करताना कुंडीतील पाण्याचा निचरा होईल याची काळजी घ्या. 


- खतांचा वापर करा 
रोपांवर पावसाच्या दिवसांमध्ये बुरशी येणं स्वाभाविक आहे. हे टाळण्यासाठी रोपट्यांवर दर तीन- चार दिवसांनी सौम्य खतांचा वापर करा. 


- पाण्याचा अती वापर टाळा
पावसाळ्यामध्ये रोपट्यांना अपेक्षेहून जास्त पाणी मिळतं. त्यामुळं कुंडीच्या खाली असणारं पाणी वेळोवेळी रिकामं करत रहा. अन्यथा माती ते पाणी पुन्हा शोषून घेईल. शक्यतो पाऊस नित्यनियमानं असल्यास अशा वेळी झाडांना ठराविक दिवसांच्या अंतरानं पाणी द्या. 


- छाटणी 
रोपट्यांपासूनच नवी रोपं तयार करण्यासाठी पावसाचे दिवस उत्तम ठरतात. असं केल्यास फार कमी वेळात नवी पालवीही धरते. 


- थेट पावसात रोपं ठेवू नका
 पाऊस रोपट्यांसाठी फायद्याचा असला तरीही थेट पावसाचं पाणी पडेल अशा भागात झाडं ठेवू नका. झाडांची पानं आणि फांद्यांवर दररोज लक्ष द्या. 


शक्य असेल तितक्या सूर्यप्रकाशात झाडं ठेवण्याचा प्रयत्न करा, शिवाय रोपं ठेवण्याचं ठिकाण बदलण्याचाही प्रयत्न करा. असं केल्यास रोपांना बराच फायदा होईल आणि तुमच्या घरातील लहानशी बाग सदैव बहरलेली राहील.