फक्त पैसेच नव्हे, भाविकांच्या जमिनीचे कागदपत्रही इथं दान केले जातात; तिरुपती देवस्थानची श्रीमंती किती माहितीये?
Tirupati Balaji Temple Property: देशातील सर्वात श्रीमंत तीर्थक्षेत्र आणि मंदिर संस्थान अशीच तिरुमला तिरुपती संस्थानची ओळख. इथं दान स्वरुपात काय-काय दिलं जातं माहितीये?
Tirupati Balaji Temple Property : देशातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी ओळख असणाऱ्या तिरुपती तिरुमला मंदिर परिसरामध्ये नुकतीच एक अप्रिय घटना घडली. बुधवारी मंदिर परिसरातील वैकुंठ द्वार दर्शन तिकीट केंद्रांनजीक झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये काही भाविकांचा मृत्यू ओढावला. कैक भाविक या दुर्घटनेमध्ये जखमी झाले. देवाच्या दर्शनासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांवर ओढावलेल्या या संकटानं संपूर्ण देश ओढावला. दरम्यानच या देवस्थानशी संबंधित अनेक गोष्टींविषयी चर्चा सुरू झाल्या.
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व नियोजन तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या वतीनं केलं जातं. हे देशातील सर्वाधिक श्रीमंत विश्वस्त मंडळांपैकी एक असून, या मंदिरात देवापुढं देणगी स्वरुपात पैसे (रोकड), सोनं- चांदी, हिरे, रत्नाचं भांडार आहे. दगभरातील श्रीमंत देवस्थान ट्रस्ट म्हणूनही या मंदिराकडे पाहिलं जातं. या देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या श्रीमंतीचा मूळ आकडाही सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
दर दिवशी 2 कोटींचं दान
उपलब्ध माहितीनुसार तिरुपती मंदिरात दर दिवशी 2 कोटी रुपयांचं दान दिलं जातं. एखाद्या महत्त्वाच्या धार्मिक, अध्यात्मिक सोहळ्याच्या दिवशी किंवा शुभदिनी हा आकडा 3 ते 4 कोटींवर जातो. फक्त रोकड आणि सोनं-चांदीच नव्हे, तर या मंदिरात देवापुढं दान म्हणून चक्क काही भाविक जमिनीचे कागदपत्र, शेअर, बाँडसुद्धा दान करतात. काही वर्षांपूर्वीच दाक्षिणात्य अभिनेत्री कंचनानं या मंदिराला 15 कोटींचा भूखंड दान केला होता. तर, गिरजा पांडेंसारख्या भाविकांनी आपली संपूर्ण संपत्ती या मंदिराच्या नावे केली आहे.
हेसुद्धा वाचा : देवाचं नाव घेत आनंद महिंद्रा यांनी लिहीलेली नवी पोस्ट इतकी का वाचली जातेय? एका क्षणात डोळे उघडणारे शब्द...
2022 मध्ये मंदिर संस्थानच्या वतीनं एकूण श्रीमंतीचा अधिकृत आकडा जाहीर करण्यात आला होता. जिथं मंदिरातील विश्वस्त मंडळाकडे नमूद असल्यानुसार हा संपत्तीचा आकडा 2.5 लाख कोटी रुपये असल्याचं सांगण्यात आलं. हल्लीच्या दिवसांमध्ये हा आकडा निश्चितपणे मोठ्या फरकानं वाढला असणार. आतापर्यंत या मंदिरच्या दानपेटीत 11,329 किलो सोनं असून, त्याची किंमत 18000 कोटी रुपये सांगितली जाते. तर, 25000 किलो चांदीचाही या दानरुपी खजिन्यामध्ये समावेश आहे. मंदिर संस्थानकडे भाविकांनी दान केलेले कोट्यवधी रुपयांचे हिरे, रत्नजडित आभूषणं असून, विविध बँकांमध्ये 13,287 रुपयांच्या FD चीसुद्धा नोंद आहे. या ठेवींमधून मंदिराला दरवर्षी 1000 कोटी रुपये इतकं व्याज मिळतं. 2023 मध्ये या मंदिरानं 1161 रुपयांची आणखी एक FD सुद्धा केली होती.
हा झाला दान केलेल्या रकमेचा हिशोब. तिरुपती मंदिर संस्थानकडून दरवर्षी प्रसाद स्वरुपात लाडूंची विक्री करत 500 कोटी रुपयांची कमाई केली जाते. इथं येणारे कैक भाविक केशवपन करत, देवाला केसही दान करतात. ज्याचा लिलाव करून मंदिर संस्थाननं 2018 मध्ये 1,87,000 किलो केलांपासून तब्बल 1.35 कोटी रुपये कमवले होते.
(वरील माहिती उपलब्ध आकडेवारीवर आधारित असून, झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)