Tirupati Laddoos Controversy: तिरुपती मंदिरातील लाडू प्रसादात प्राण्यांची चरबी मिसळल्याच्या आरोपानंतर वाद पेटला आहे. यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु असून केंद्रानेही दखल घेतली आहे. मात्र या वादाचा परिणाम श्री वेंकटेश्वर मंदिरातील प्रसादावर अजिबात झालेला नाही. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, फक्त 4 दिवसांत तब्बल 14 लाख लाडूंची विक्री झाली आहे.  या मंदिरात रोज जवळपास 60 हजार भक्त दर्शनासाठी येत असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार दिवसांत 14 लाख लाडूंची विक्री झाल्याची माहिती मंदिर प्रशासनाने दिली आहे. 19 सप्टेंबर रोजी एकूण 3.59 लाख लाडू, 20 सप्टेंबरला 3.17 लाख, 21 सप्टेंबरला 3.67 लाख आणि 22 सप्टेंबर रोजी 3.60 लाख लाडू विकले गेले. विक्रीचे आकडे त्यांच्या रोजच्या सरासरी 3.50 लाख लाडूंशी जुळत आहेत. याबाबत तेथील भक्तांना विचारण्यात आलं असता, आमची श्रद्धा इतकी आहे की ती अशा गोष्टींनी कमी होणार नाही. तर काही भक्तांनी ही आता भुतकाळातील बाब झाली असल्याचं सांगितलं आहे. 


रोज मंदिरात जवळफास 3 लाख लाडू तयार केले जातात. मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त मोठ्या प्रमाणात हे लाडू खरेदी करत असतात. आपल्या कुटुंब, मित्रांना देण्यासाठी ते अतिरिक्त लाडू घेतात. तिरुपती लाडूच्या घटकांमध्ये बंगाल हरभरा, गाईचे तूप, साखर, काजू, मनुका आणि बदाम यांचा समावेश होतो. लाडू तयार करण्यासाठी दररोज तब्बल 15,000 किलो गाईचे तूप वापरले जाते.


नेमका वाद कुठून सुरु झाला?


आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी लाडूंमध्ये निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरण्यास परवानगी दिल्याचा आरोप केल्यानंतर बुधवारी वाद सुरू झाला.


गुजरातमधील प्रयोगशाळेच्या अहवालाचा हवाला देऊन, नायडू यांच्या पक्षाने तुपात “बीफ टॉलो”, “लार्ड” (डुकराच्या चरबीशी संबंधित) आणि माशाचे तेल असल्याचा दावा केला. जगन मोहन रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदावर असताना लाडूंमध्ये निकृष्ट घटक आणि प्राण्यांची चरबी वापरण्यास परवानगी दिल्याचा आरोप  आहे. रेड्डी यांनी आरोप फेटाळून लावले आहे. 


केंद्र सरकारनेही याची दखल घेतली असून आंध्र प्रदेश सरकारकडून लाडूत नेमके कोणते पदार्थ वापरले आहेत याची माहिती मागवली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा म्हणाले की, त्यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोलून आरोपांबाबत अहवाल मागवला आहे. 


“मला सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रकरणाची माहिती मिळाली. मी आज चंद्राबाबू नायडू यांच्याशी बोललो आणि त्यांना उपलब्ध अहवाल शेअर करण्यास सांगितले जेणेकरुन आम्ही त्याचे परीक्षण करू शकू. मी राज्य नियामकांशीही बोलेन आणि त्यांची मते जाणून घेईन. अहवालाची तपासणी केली जाईल आणि FSSAI अंतर्गत कायदेशीर चौकटी आणि नियमांमध्ये योग्य ती कारवाई केली जाईल,” असं नड्डा म्हणाले आहेत. 


जगन रेड्डी यांनी फेटाळले आरोप


वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस जगन रेड्डी (YS Jagan Reddy) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून त्यांनी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी तिरुमला तिरुपती देवस्थानमवर (टीटीडी) लावण्यात आलेले आरोप निराधार असल्याचा दावा करत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. 


जगन रेड्डी यांनी तिरुपतीच्या लाडूंमध्ये (Tirupati Laddu) प्राण्यांची चरबी (Animal Fat) वापरल्याचा आरोपांवर संताप व्यक्त केला आहे. चंद्राबाबू नायडू यांचं बेजबादार आणि राजकीय प्रेरित विधान करोडो हिंदूंच्या भावना दुखावणारं आणि जगप्रसिद्ध टीटीडीच्या (TTD) पवित्रतेला धुळीत मिळवणारं आहे असं ते म्हणाले आहेत. 


प्रसादम तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी TTD कडे कठोर प्रक्रिया आणि गुणवत्ता तपासणी आहे यावर त्यांनी भर दिला. ते म्हणाले की तूप खरेदीमध्ये ई-टेंडरिंग प्रक्रिया, एनएबीएल-प्रमाणित प्रयोगशाळा चाचण्या आणि बहु-स्तरीय तपासण्यांचा समावेश होतो. तेलुगु देसम पक्षाच्या (टीडीपी) राजवटीतही अशीच प्रक्रिया होती, असं त्यांनी सांगितलं.