अविश्वास प्रस्ताव:कोणत्या पक्षाने कशी खेळली चाल?
प्रत्यक्ष अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी राजकीय पक्षांच्या भूमिका कशा बदलल्या गेल्या हेही पहायला मिळाले.
नवी दिल्ली: केंद्रातील विद्यमान भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारविरोधात तोलुगू देसम पक्षाने आणलेल्या अविश्वास ठरावावर संसदेत घमासान झाले. अर्थात सत्ताधारी पक्षाकडे पुरेसे संख्याबळ असल्याने अविश्वास ठराव संमत झाला नाही. पण, या निमित्ताने सरकारच्या विरोधात किती खदखद आहे. तसेच, विविध आघाड्यांवर सरकार कसे अपयशी ठरले हे पहायला मिळाले. दरम्यान, सरकारलाही आपण केलेल्या कामाचे ढोल बडवता आले. पण, या सर्वांत प्रत्यक्ष अविश्वास ठरावाच्या मतदानावेळी राजकीय पक्षांच्या भूमिका कशा बदलल्या गेल्या हेही पहायला मिळाले. या मतदानादरम्यान अनेक पक्षांनी आपापल्या फायद्याच्या दृष्टीकोनातून चाली खेळल्या. त्या अशा...
काँग्रेसचा इरादा पक्का
अविश्वास ठरावावर दिवसभर सुरू राहिलेल्या चर्चेदरम्यान, काँग्रेसचा इरादा पक्का होता. काँग्रेस नेत्यांच्या भाषणातूनही हा इरादा दिसून आला. अविश्वास ठरावावरील चर्चा ही थेट २०१९ मध्ये हाणाऱ्या निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून पाहीले जात होते. या चर्चेदरम्यान, काँग्रेसने विरोधकांची जागा भरून काढण्याचा पुरेपूर उपयोग केला. त्यात त्यांना अपेक्षीत यशही आले.
तृणमूल काँग्रेस
तृणमूल काँग्रेसने भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवत आपली वेगळी वाट स्पष्टपणे अधोरेखीत केली. तृणमूलचे नेते सौगत रॉय यांनी सांगितले की, येणारी निवडणूक ही प्रादेशिक पक्षांची असेल. ज्यात आमची भूमिका महत्त्वाची असेल.
शिवसेना -
अविश्वास ठरावावरून शिवसेना भाजपसोबत असेल की विरोधात याबाबत पहिल्यापासूनच उत्सुकता होती. पण, शिवसेनेने डबल गेम खेळला. शिवसेना प्रत्यक्ष मतदानावेळी तटस्थ राहिली. मुखपत्र सामनातून भाजपवर येथेच्छ टीका केल्यावर मतदानावेळी शिवसेना भाजप विरोधात मतदान करेन असे संकेत होते. मात्र, प्रत्यक्षात घडले भलतेच.
एआयडीएमके
एआईडीएमकेची अविश्वास ठराव चर्चेला आल्यापासूनच द्विधा मनस्थिती दिसली. हा पक्ष भाजपला पाठिंबा तर देत होता पण, तो पाठिंबा पूर्ण आहे असेही दाखवत नव्हता. या पक्षाचीही भूमिका अत्यंत न्यूट्रल होती.
बीजू जनता दलची
ओडिसाच्या नवीन पटनायक यांच्या पक्ष बिजू जनता दलानेही काँग्रेस आणि भाजपलाही समान अंतरावर ठेवले. या पक्षाने पूर्ण चर्चेतूनच स्वत:ला वेगळे ठेवले. अविश्वास ठरावावर चर्चा सुरू असतानाच या पक्षाने सभागृहातून बाहेर पडणे पसंद केले.