Modi Swearing In Ceremony Mamata Banerjee: तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या खासदार सागरिका घोष यांनी आपल्या एक्स (आधीचं ट्वीटर) अकाऊंटवरुन नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. रविवारी सायंकाळी नवी दिल्लीमध्ये राजभवनाच्या प्रांगणात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यावरुन सागरिका यांनी टीका केली आहे. आपल्या पोस्टमध्ये सागरिका यांनी मोदींच्या विरोधक तसेच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदींच्या शपथविधीदरम्यान काय करत होत्या यासंदर्भातील खुलासाही केला आहे.


ममता बॅनर्जींनी सर्व लाईट्स बंद केल्या अन्...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"जे कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शपथविधीसंदर्भात आनंद साजरा करत आहेत त्यांना देशातील एकमेव महिला मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींकडून खास संदेश आहे. त्यांनी (ममता बॅनर्जींनी) या कथित 'सोहळ्या'दरम्यान घरातील सर्व विजेचे दिवे बंद केले आणि त्या अंधारात बसून राहिल्या होत्या. बहुमत गमावलेल्या 'पंतप्रधानां'ना जनतेनं नाकारलं आहे. वाराणसीमध्ये ते जवळपास पराभूत झाले होते. अयोध्येत त्यांचा पराभव झाला. स्वकेंद्रीत निवडणूक प्रचार केल्यानंतरही त्यांना बहुमत गाठता आलेलं नाही. मोदींऐवजी इतर व्यक्तीचा विचार केला पाहिजे. भाजपाने नवा नेता निवडायला हवा," अशी टीका सागरिका यांनी केली आहे.



सागरिका यांनीही सोहळ्याकडे फिरवली पाठ


सागरिका यांनी रविवारी सायंकाळी झालेल्या शपथविधीच्या आधीच आपण या सोहळ्याला जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं. पत्रकारिता क्षेत्रातून राजकारणात आलेल्या सागरिका यांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भातील माहिती दिलेली. "मोदींनी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याची ‘नैतिक वैधता’ विरोधकांना मान्य नाही," असं म्हणत सागरिका यांनी या सोगळ्याला जाणार नसल्याचं सांगितलं होतं. 


ममतांनीही केलेला विरोध


8 जून रोजी ममता बॅनर्जींना त्या मोदींच्या शपथविधी सोहळ्याला जाणार का असं विचारण्यात आलेलं. त्यावर त्यांनी नकारात्मक उत्तर दिलं होतं. "मला आमंत्रण आलेले नाही आणि मी जाणारही नाही," असं उत्तर ममतांनी या सोहळ्यासंदर्भात पत्रकारांनी विचारलं असता दिलं. 



अनेकांनी केला विरोध


सागरिका यांनी केलेल्या या पोस्टवरुन सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं पाहायला मिळालं. अनेक विरोधी पक्षाच्या समर्थकांनी ममतांच्या कृतीचं आणि सागरिका यांच्या पोस्टचं कौतुक केलं. तर अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली. ममता बॅनर्जी यांचा स्वत:चा विधानसभेला पराभव झाला होता. त्या मागच्या दाराने मुख्यमंत्री झाल्या त्यावेळीही त्या अशाप्रकारे सर्व दिवे बंद करुन अंधारात बसल्या होत्या का? असा प्रश्न रिजीड डेमोक्रॅसी नावाच्या खात्यावरुन विचारण्यात आला आहे. मोदींच्या भाजपाने एकट्याने 240 जागा जिंकल्या आहेत. बहुमतापेक्षा हा आकडा केवळ 32 ने कमी आहे, अशी आठवण काहींनी सागरिका यांना करुन दिली आहे.



दरम्यान, विरोधकांपैकी केवळ काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.