नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुकीत यश संपादन केल्यानंतर पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसतर्फे निवडून आलेल्या अभिनेत्री मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांनी संसदेला भेट दिली. यावेळी पाश्चिमात्य कपड्यांना प्राधान्य दिल्यामुळे, वेशभूषेच्या कारणावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणात खिल्लीही उडवण्यात आली. पण, मिमी यांनी या सर्व ट्रोल्स आणि खिल्ली उडवणाऱ्यांना सडेतोड उत्तर देत आपली भूमिका स्पष्ट केली. मी काही बोलण्यापेक्षा कृती करण्यावर विश्वास ठेवते, असं सूचक विधान त्यांनी केलं. 


सोशल मीडियावर आपली खिल्ली उडवणारे रिकामटेकडे आहेत, त्यांच्याकडे दुसरं कोणतंच काम नाही असंही त्या म्हणाल्या. 'आयएनएस' या वृत्तसंस्थेशी संवाद साधत त्यांनी ही भूमिका मांडली. 'ज्यावेळी एक महिला खासदार तिच्या कपड्यांच्या निवडीवरुन चर्चेचा विषय ठरते अशा वेळी महिला सबलीकरणाविषयी बोलणं वायफळ. सर्वजण समानतेची चर्चा करतात. पण, त्यांनाच बदल पाहणं मात्र कठीण वाटतं', असं मिमी म्हणाल्या.


बदल पाहण्याची मानसिकता अद्यापही जनसामान्यांत सरावलेली नाही, असं सांगणाऱ्या मिमी यांनी २०१९ या वर्षी लोकसभेत महिलांची संख्या जास्त असण्याची बाब अधोरेखित करत याविषयी आनंदही व्यक्त केला. 


आपल्यावर होणाऱ्या टीकता पाहता सध्याच्या घडीला त्याकडे दुर्लक्ष करत आपण आपल्या राजकीय कारकिर्दीकडे आशावादी नजरेने पाहत असल्याचं मिमी यांनी स्पष्ट केलं. येत्या काळात आपल्याला नेमकं कोणत्या विषयावर काम करायचं आहे, हे निर्धारित केल्याचंही ती म्हणाली. 



का उडवण्यात आली होती खिल्ली? 


मिमी चक्रवर्ती आणि नुसरत जहाँ यांनी संसद भेटीच्या पहिल्याच दिवशी सर्वाचं लक्ष वेधलं होतं. पाश्चिमात्य कपड्यांमध्ये दिसलेल्या या दोन्ही खासदारांनी अनेकांचं ल७ वेधलं. बहुतांश नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मिमी यांनी ट्विटरवर संसदेबाहेरील फोटो पोस्ट केल्यानंतर याविषयीच्या चर्चांनी जोर धरला होता.