सूरत : देशाच्या सीमेवर लढणाऱ्या आणि सैन्यदलात सहभागी होत या देशाचं ऋण फेडणाऱ्या सैनिकांना पाहिल्यावर एक गोष्ट लगेचच लक्षात येते. ती म्हणजे निस्सिम देशभक्ती आणि दाटून येणारा प्रचंड अभिमान. शब्दांतही व्यक्त करता न येणाऱ्या याच भावनेसोबत एक इच्छाही अनेकांच्याच मनात घर करुन असते. ती म्हणजे सैन्यदालाचा गणवेश एकदातरी परिधान करण्याची. जवान होण्याची भावना एकदातरी अनुभवण्याची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशभक्ती आणि देशाभिमानाची हीच भावना लक्षात घेत गुजरातमधील एका शाळेत विद्यार्थ्यांना चक्क सैन्यदलाच्या गणवेशाप्रमाणेच शाळेच्या खेळाच्या तासासाठीचा गणवेश देण्यात आला आहे. जवानांनी देशासाठी केलेल्या बलिदानाचं आपण देणं लागतो याचीच जाणिव करुन देण्यासाठी आणि त्या बलिदानाची जाण ठेवण्यासाठीच हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 


गुजरातच्या कैलाश मानस विद्यामंदिरातील हा अनोखा उपक्रम अनेकांचं लक्ष वेधतो. बरं, सैन्यदलाविषयीची ही भावना आताच्या परिस्थितीनंतर जागृत झाली आहे, असं नाही. तर, पंधरा वर्षांपासून ही अनोखी संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाची भावना जागृत करत आहे. मुख्य म्हणजे विद्यार्थांच्या मनातही या उपक्रमामुळे प्रचंड अभिमानाची भावना पाहायला मिळत असून, जणू आपणही सैन्यदलाचाच एक भाग असल्याची जाणिव त्यांना होते. 



'या गणवेशाची सुरुवात पंधरा वर्षांपूर्वीच झाली. सीमेवर असणाऱ्या जवानांमुळे आणि त्यांच्या त्यागामुळेच आपण, सारा देश सुरक्षित आहे. या अशा संस्थेचा, सुरक्षा व्यवस्थेचा आदर हा केलाच गेला पाहिजे यासाठीच शाळेसाठी असा गणवेश असल्याची कल्पना अंमलात आणण्यात आली', असं मुख्याध्यापिका इंदिरा पटेल म्हणाल्या.