खरीप हंगामासाठी केंद्र सरकारकडून आज हमीभावावर निर्णय
यंदाच्या खरीप हंगामातील सर्वात प्रमुख पीक असणाऱ्या भातापिकाला गेल्यावर्षीच्या तुलनेत हमीभावात २०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली: खरीपाच्या हंगामासाठी आज (४ जुलै) केंद्र सरकार हमीभावाचा निर्णय घेणार असून, उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव निश्चित करण्याच्या निर्णयावर आज शिक्कामोर्तब होणार आहे. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडाळची भेट घेतली. या भेटीवेळी मोदींनी निर्णायाची माहिती शेतकऱ्यांना दिली होती.
हमीभावात २०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता
दरम्यान, यंदाच्या खरीप हंगामातील सर्वात प्रमुख पीक असणाऱ्या भातापिकाला गेल्यावर्षीच्या तुलनेत हमीभावात २०० रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे. हमीभाव निश्चित करण्यासाठी सरकारनं नवं सूत्र आखलंय.त्यानुसार प्रत्येक पिकासाठी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात केलेली मेहनतीचा मोबदलाही हमीभाव निश्चित करण्यासाठी मोजला जाणार आहे.
सरकारी तिजोरीवर १२ ते १५ हजार कोटींचा बोजा
दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी येत्या अर्थसंकल्पात खरीपातील १४ पिकांसाठी उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव निश्चित करण्याचे अश्वासन दिले होते. हे अश्वासन वास्तवात आल्यास धानाचा हमीभाव १५५० वरून १,७५० रुपये प्रति क्विंटल केला जाण्याची शक्यता आहे. गहू-तांदूळ वगळता इतर कृषी उत्पादनांना हमीभाव देण्यासाठी सरकारी तिजोरीवर १२ ते १५ हजार कोटींचा बोजा पडू शकतो.