पाटणा - भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दोन वेळा निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांना संयुक्त जनता दला घेण्याचा सल्ला मला दिला होता. त्यांच्या सल्ल्यानंतरच प्रशांत किशोर यांचा पक्षप्रवेश झाल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सांगितले. एका खासगी वाहिनीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नितीशकुमार यांनी प्रशांत किशोर संयुक्त जनता दलात कसे गेले, याचा खुलासा केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला होता. त्यानंतर काही दिवसांतच त्यांना पक्षाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष करण्यात आले होते. नितीशकुमार यांचा वारसदार म्हणूनच प्रशांत किशोर यांना पक्षात आणण्यात आल्याची चर्चा तेव्हापासून सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नितीशकुमार म्हणाले, प्रशांत किशोर यांनी संयुक्त जनता दलात प्रवेश केला असला, तरी ते आमच्यासाठी नवे नाहीत. २०१५ मध्ये बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमच्या पक्षासाठी काम केले होते. त्यामुळे त्यांचा आणि माझा जवळचा संबंध आहे. त्यानंतर थोड्या कालावधीसाठी ते एका दुसऱ्या कामाच्या गडबडीत होते. अमित शहा यांनी दोन वेळा माझ्याशी बोलून प्रशांत किशोर यांना माझ्या पक्षात घेण्याचा सल्लाही दिला होता. त्यानंतर हे सर्व घडले. आता सर्व स्तरातील तरुणांना संयुक्त जनता दलाकडे आकर्षित करण्याचे काम प्रशांत किशोर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. ज्यांच्याकडे कसलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा तरुणांनाही या क्षेत्राकडे आणण्यासाठी ते महत्त्वाची भूमिका बजावतील.


प्रशांत किशोर यांच्याबद्दल मला जिव्हाळा आहे. पण आपण कुठल्या साम्राज्यात राहात नाही. त्यामुळे माझा वारसदार म्हणून त्यांच्याकडे बघण्यात काहीच हाशील नाही, असेही नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव माझ्याविरोधात काहीही बोलत असले, तरी माझ्या त्यांना सदिच्छाच आहेत, असेही त्यांनी म्हटले आहे.