हैदराबाद महापालिका निवडणुकीत BJP आणि MIM यांच्यात कांटे की टक्कर
हैदराबाद महापालिका निवडणुकीचा निकाल (Hyderabad GHMC Election Results 2020)
हैदराबाद : हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीच्या निकालात यंदा कांटे की टक्कर पाहायला मिळाली. हायप्रोफाइल हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भारतीय जनता पार्टी ऐतिहासिक विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्यासारखे दिसत होते, परंतु आता चित्र थोडं बदललं आहे. भाजप आणि एआयएमआयएम मध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळते आहे. सत्ताधारी पक्ष टीआरएस अव्वल स्थानावर आहे.
महापालिका निवडणुकीच्या ताज्या निकालांनुसार एआयएमआयएमने 33 जागा जिंकल्या असून 10 जागांवर आघाडीवर होता. टीआरएसने 45 जागा जिंकल्या आहेत. तर 17 जागांवर आघाडीवर आहेत. यासोबतच MIM ला भाजप जोरदार झुंज देत आहे. भाजपने 10 जागा जिंकल्या असून 10 जागांवर आघाडीवर आहे.
सुरुवातीला येथे भाजप इतकी चांगली कामगिरी करेल असं कुणाला वाटलं नव्हत. एक्झिट पोलमध्येही टीआरएस बाजी मारेल असेच दिसत होते. भाजपसाठी येथे आशा निर्माण झाली आहे. येथे पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली होती. भारतीय जनता पक्षाच्या वतीने अमित शहा यांच्यासह अनेक बडे नेते मैदानात उतरले होते.
महानगरपालिकेची निवडणूक असली तर भाजपने केलेल्या जोरदारा प्रचारामुळे यंदा वेगळं चित्र निर्माण झालं होतं. गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सारखे मोठे नेते येथे मैदानात उतरले होते.
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिका निवडणुकीत बॅलेट पेपर्सचा वापर करण्यात आला. त्याच वेळी कोरोना साथीच्या आजारामुळे या वेळी केवळ 35 टक्के मतदान झाले. येथे एकूण 74 लाखाहून अधिक मतदार असून त्यात 38,89,637 पुरुष मतदार आणि 35,76,941 महिला मतदारांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे यावेळी निवडणुकीत सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समिती (टीआरएस), भारतीय जनता पार्टी आणि असदुद्दीन ओवैसी यांचा एमआयएम पक्ष अशी तिंरगी लढत पाहायला मिळाली.